कोरोनाच्या अफवेने पोल्ट्री व्यावसायिक देशोधडीला

कोरोना व्हायरसच्या अफवेमुळे पोल्ट्री व्यवसाय देशोधडीला लागला आहे. 

Updated: Mar 7, 2020, 10:06 PM IST
कोरोनाच्या अफवेने पोल्ट्री व्यावसायिक देशोधडीला title=
फाईल फोटो

अनिरुद्ध दवाळे, झी माडिया, अमरावती : कोरोना व्हायरसच्या अफवेमुळे पोल्ट्री व्यवसाय देशोधडीला लागला आहे. ग्राहक नसल्याने एक किलोची जिवंत कोंबडी दहा रुपयांना विकण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे.

अमरावती शहरातल्या मटन मार्केटमध्ये १० रुपयांना जिवंत कोंबडीच्या पाट्या.. दोन अंड्याच्या भावात किलोची कोंबडी मिळू लागलीय. चिकनच्या माध्यमातून कोरोना व्हायरस परसतोय अशी अफवा सोशल मीडियावर फिरु लागली आहे. त्यामुळे चिकन आणि अंड्यांना कोणीही विचारत नाही. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक रडकुंडींला आलेत.

सरकारने अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले, तरीही अफवा थांबत नाहीत. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायच धोक्यात आला आहे. चिकनच्या माध्यमातून कोरोना व्हायरस पसरत नाही. पण निव्वळ अफवेमुळे पोल्ट्री व्यवसाय भुईसपाट होण्याची वेळ आली आहे. 

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये आयोजित होणाऱ्या यात्रांवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. राज्य शासनाकडून नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात मोठ्याप्रमाणावर लोक एकत्र जमणार नाहीत, याबाबत काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी लोकांना मेळावे आणि यात्रांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या राज्यभरातील यात्रा रद्द होण्याची दाट शक्यता आहे. 

भारतात कोरोना व्हायरसची २९ रुग्णांना लागण झाली आहे. २९ रुग्ण आढळल्यामुळे दिल्लीत उपाययोजनांसाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारने वेगवेगळ्या बैठका घेतल्या. कोरोनाशी लढण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. तर चीनमध्ये कोरोना व्हायरसरमुळे आतापर्यंत ३ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.