कोल्हापुरात हायव्होल्टेज ड्रामा, ठाकरे अन् शिंदेंचे कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांचा फौजफाटा तैनात

कोल्हापुरात अंबादास दानवे वरपे कुटुंबीयांच्या भेटीला पोहोचल्याने परिस्थिती चिघळली आहे. राजेश क्षीरसागर यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने वरपे कुटुंबाला मारहाण केल्याच्या आरोपानंतर अंबादास दानवे भेटीला पोहोचले.     

शिवराज यादव | Updated: Feb 8, 2024, 05:55 PM IST
कोल्हापुरात हायव्होल्टेज ड्रामा, ठाकरे अन् शिंदेंचे कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांचा फौजफाटा तैनात title=

कोल्हापुरात माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) वरपे कुटुंबीयांच्या भेटीला पोहोचल्याने परिस्थिती चिघळली आहे. राजेश क्षीरसागर यांचे कार्यकर्ते त्यांच्या घराबाहेर जमले असून ठाकरे गटाचे कार्यकर्ते असल्याने हायव्होल्टेज ड्रामा सुरु आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राजेश क्षीरसागर यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने वरपे कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप आहे. 

नेमकं प्रकऱण काय?

राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या मुलाने शेजाऱ्यांना मारहाण केली होती. राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून रात्रभर सुरु असलेले कार्यक्रम, पार्ट्या यामुळे होत असलेल्या त्रासाला शेजाऱ्यांनी विरोध केला होता. यानंतर राजेश क्षीरसागर आणि त्यांचा मुलगा ऋतूराज यांनी राजेंद्र वरपे आणि त्यांच्या मुलाला मारहाण केली होती. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली असा आरोप वरपे कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी याची दखल घेतली. 

दरम्यान या राड्यावर प्रतिक्रिया देताना राजेश क्षीरसागर म्हणाले आहेत की, "काँग्रेसप्रणीत खासगी सावकाराला पाठीशी घालण्यासाठी अंबादास दानवे जात आहेत ही शोकांतिका आहे. या खासगी सावकाराने अनेकांना लुटलं. माझ्याकडे तक्रारी आल्यानंतर मी त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी दिल्या असून, गुन्हा दाखल केला होता. त्यांच्यावर निलंबनाची कारवाईही करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्याला अनेक कामं असतात, जनतेला न्याय द्यायचा असतो. पण खासगी सावकाराला पाठीशी घालण्याचं काम करत असतील तर दुर्दैवी आहे. ते विरोधी पक्षनेते असल्याने त्यांचा आदर असून, एकट्याने जायला हवं होतं. पण त्यांचा स्टंट सुरु आहे". वरपे यांच्यावरही गुन्हे दाखल असल्याचा दावा राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. 

अंबादास दानवे यांनी या घटनेवर म्हटलं आहे की, "कोणावर अन्याय होत असेल तर गेलं पाहिजे या हेतूने आलो आहे. मी कोणविरोधात आलेलो नाही. घऱात घुसून मारहाण केली असतानाही गुन्हा दाखल झालेला नाही. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असून असे अनेक विरोध पाहिले आहेत".

अंबादास दानवेंनी पोलीस अधिक्षकांना फोन करुन झापलं

याप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख महेंद्र पंडित (SP Mahendra Pandit) यांना फोन करुन झापलं. तुमची आणि क्षीरसागर यांची मस्ती चालणार नाही अशा शब्दांत त्यांनी खरडपट्टी केली.

"त्यांना मारहाण झाली, त्यांचा फ्लॅट घेतला. तुम्ही काय त्यांना संरक्षण देताय का? मग पुढे कारवाई का झाली नाही? मी आता त्यांना तुमच्या ऑफिसात घेऊन येतो, तुम्ही कुठे आहात? मग एक अधिकारी माझ्याकडे पाठवा, त्यांचा जबाब देतो. कारवाई झाली पाहिजे सांगून टाकतो. मस्ती चालणार नाही पोलिसांची आणि राजेश क्षीरसागरचीपण, सांगून टाकतो. समजलं का...मी आता त्यांच्या घरी जात आहे तिथे एक जबाबदार अधिकारी पाठवा. तिथे त्यांचा जबाब नोंदवून घ्या. काय करायचं ते करा कलम टाका, नका टाकू पण एफआयआर करा. अन्यथा अधिवेशन सुरु झाल्यावर मी हा मुद्दा उपस्थित करेन," असं अंबादास दानवे फोनवर म्हणाले.