मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिवाजी पार्क येथील गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर आपली तोफ डागली होती. यावरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केलीय.
काल शिवाजी पार्कात भाजपचा लाऊडस्पीकर वाजत होता. त्यांचीच स्क्रिप्ट होती. टाळ्या घोषणाही त्यांच्याच होत्या. कालचा भोंगाही भाजपचाच होता. शरद पवारांनी जातीयवाद पसरवला. पण, त्याच शरद पवारांच्या चरणाशी तुम्ही जात होतात, सल्ला घेत होतात याची आठवण राऊत यांनी करून दिली.
काल मराठी भाषा भवनाचं उदघाटन झालं. त्याचं स्वागत राज ठाकरेंनी करायला हवं होतं. पण, भाजपची मळमळ दुसऱ्यांच्या भोंग्यातून बाहेर पडली. कुणाच्या भोंग्याचं काय करायचं हे सरकार बघेल असे राऊत म्हणाले.
अडीच अडीच मुख्यमंत्री पदावरून राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, शिवसेना भाजपमध्ये काय झालं ते आम्ही बघू. त्याकडे दुसऱ्यांनी बघण्याची गरज नाही. लोकांनी मतदान युतीला केलं होतं, आघाडीला नाही यावर ते म्हणले की, देशात असं अनेकदा झालंय. युतीचं बहुमत निर्माण झालं नाही. पण आघाडीचं झालं त्यामुळेच महाविकास सरकार आलं. परंतु, हे तुम्हाला इतके दिवसांनी कसं आठवलं. अक्कल दाढ इतक्या उशिरा कशी येते, अशी खोच टीका राऊत यांनी केली.