मुंबई : Rain Latest News in Maharashtra : यावर्षी पाऊसकाळ कमी आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच परतीचा पाऊस सुरु होत आहे, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतलीय. मात्र राज्यात 1 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.
27 ते 30 ऑगस्टदरम्यान काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यासाठी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पावसाबाबत हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.
नैऋत्य मान्सून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात माघारीच्या ( परतीकडे) टप्प्यात प्रवेश करेल, जे सामान्य तारखेच्या सुमारे पंधरवडा आधी असेल. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गुरुवारी ही माहिती दिली. नैऋत्य मान्सून परतीची साधारण तारीख 17 सप्टेंबर आहे. तथापि, नैऋत्य मान्सूनची वास्तविक परतीचा प्रवास हा सामान्यतः एकतर आधी किंवा नंतर होतो, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
IMD ने गुरुवारी जारी केलेल्या अंदाजामध्ये म्हटले आहे की, वायव्य भारतातील काही भागांतून नैऋत्य मान्सून 1 सप्टेंबरपासून माघार घेण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. देशभरात मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा नऊ टक्के जास्त आहे, परंतु उत्तर प्रदेश, बिहार आणि मणिपूर सारख्या राज्यांमध्ये दीर्घ कालावधीच्या सरासरीपेक्षा सुमारे 40 टक्के पावसाची नोंद कमी झाली आहे, ज्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
उत्तर भारतात मान्सूनचा जोर कायम दिसून येत आहे. (IMD Weather Forecast Today Rainfall Alert) मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात, कहर सुरूच आहे. या काळात, ओडिशा, राजस्थान, उत्तर प्रदेशातील काही जिल्हे, उत्तराखंड, मध्य प्रदेश येथील लोक पावसातून पूर्णपणे सावरलेले नाहीत. मध्य प्रदेश आणि ओडिशामध्ये पूरसदृश परिस्थिती आहे. उत्तर प्रदेशातील नद्या धोक्याच्या पातळीवर आहेत. दरम्यान, हवामान खात्याने नवा इशारा दिला आहे. ओडिशातील महानदी आणि सुवर्णरेखा नदीच्या खोऱ्यांना पूर आल्याने शनिवारी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मध्य प्रदेशात या हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा 28 टक्के जास्त पाऊस झाला असून येत्या 24 ते 48 तासांत पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विदिशा, सागर, भिंड, मुरैना आणि श्योपूर जिल्ह्यांतील सखल भागात पूर आला आहे. राज्याची राजधानी भोपाळसह अनेक ठिकाणी वीजपुरवठा ठप्प झाला आहे.