राज्यात पुढील 48 तास पावसाचं वातावरण

6 नोव्हेंबरनंतर महाचक्रीवादळाचा परिणाम जाणवू लागेल

Updated: Nov 1, 2019, 04:19 PM IST
राज्यात पुढील 48 तास पावसाचं वातावरण title=

पुणे : राज्यात पुढील 48 तास पावसाचं वातावरण कायम राहणार असून पुणे, कोकण गोवासह अनेक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता पुणे हवामान विभागानं वर्तविली आहे. अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या महाचक्रीवादळाचा परिणाम राज्यात जाणवत आहे. त्यामुळे सध्या पाऊस पडत असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 

3 नोव्हेंबरनंतर पाऊस कमी होईल. मात्र पुन्हा 6 नोव्हेंबरनंतर महाचक्रीवादळाचा परिणाम जाणवू लागेल. त्या दरम्यान पुण्यासह उत्तर-मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. समुद्रावर निर्माण झालेलं क्यार वादळ पूर्णपणे शमलं आहे. 

मात्र सध्या सक्रिय असलेल्या महाचक्रीवादळापाठोपाठ आणखी एक चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता असल्यानं पाऊस नेमका कधी थांबणार याबद्दल सांगता येणं शक्य नसल्याचं वेधशाळेनं स्पष्ट केलं आहे.

मुंबईत ही संध्याकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस मधून मधून हजेरी लावत आहे. मान्सून गेल्यानंतर ही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी हाती आलेलं पीक पावसामुळे खराब झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या चिंता वाढल्या आहेत.