विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चेसाठी शरद पवार दिल्लीला जाणार

दिल्लीच्या निर्णयाकडे आता सगळ्यांचं लक्ष

Updated: Nov 1, 2019, 03:06 PM IST
विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चेसाठी शरद पवार दिल्लीला जाणार title=

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ३ किंवा ४ नोव्हेंबरला दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक घेणार असून विरोधी नेत्यांशी महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर चर्चा करणार आहेत. या दौऱ्यात ते सोनिया गांधी किंवा राहुल गांधींनाही भेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर राष्ट्रीय पातळीवर पवारांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. आगामी संसदेचं हिवाळी अधिवेशन, दिल्ली विधानसभा निवडणूक आणि काँग्रेस अध्यक्षपदाबाबत या बैठकीत चर्चा होण्याचीही शक्यता आहे.

शिवसेना ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जातं आहे. संजय राऊत यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतल्याने याबाबत आणखी चर्चा रंगू लागल्या आहेत. शरद पवार यांनी फोनवरुन सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा केल्याचं देखील म्हटलं जात आहे.

शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम आहे तर दुसरीकडे भाजप मुख्यमंत्रिपद सोडायला तयार नाही. भाजपानं ५ किंवा ६ नोव्हेंबरला शपथविधीची तयारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या वेळसारखंच वानखेडे स्टेडियमवर शपथविधी होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह ९ ते १० मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. एका बाजूला शिवसेनेसोबत सत्तासंघर्ष सुरू असताना भाजपानं शपथविधीची तयारी केल्याचं समजतं आहे.

दुसरीकडे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेस बाहेरुन पाठिंबा देऊ शकते अशी देखील चर्चा आहे. पण अजूनही याबाबत काहीही निश्चित झालेलं नाही. शिवसेनेकडून तसा कोणताही प्रस्ताव न आल्याचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून म्हटलं जात आहे. पण आता शरद पवार हे स्वत: दिल्लीला जावून विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत काय चर्चा करणार आणि त्यांची पुढची भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.