'रायगड तेल शुद्धीकरण प्रकल्पाबद्दल मुख्यमंत्र्यांनी नक्की कुणाशी चर्चा केली?'

४० गावातील शेतकऱ्यांचा प्रकल्पाला विरोध नसल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय

Updated: Jul 3, 2019, 08:21 PM IST
'रायगड तेल शुद्धीकरण प्रकल्पाबद्दल मुख्यमंत्र्यांनी नक्की कुणाशी चर्चा केली?' title=

प्रफुल्ल पवार, झी २४ तास, रायगड : रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाणारमधील रद्द झालेला तेलशुद्धीकरण प्रकल्प आता रायगडात येत असल्याची चर्चा सुरू झालीय. त्यामुळं इथले शेतकरी या प्रकल्पाविरोधात एकवटू लागलेत. या प्रकल्पाच्या विरोधात ४० गावातल्या शेतकऱ्यांनी आज एल्गार पुकारलाय. 

नाणारचा तेल शुद्धीकरण प्रकल्प लोकसभा निवडणुकीपूर्वी हद्दपार झाला. त्यानंतर रायगडमधल्या रोहा, अलिबाग, मुरूड आणि श्रीवर्धन तालुक्यातील ४० गावांमध्ये औद्योगिक प्रकल्पाची अधिसूचना निघाली. याच जागेवर आता नाणारमधून रद्द झालेला तेलशुद्धीकरण प्रकल्प आणायच्या हालचाली सुरू झाल्यात. याविरोधात रायगडमधील शेतकरी एकवटलेत. 

हा प्रकल्प कोकणात कुठेच येणार नसल्याचं शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलं होतं. मात्र विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरामुळे संभ्रम वाढलाय. ४० गावातील शेतकऱ्यांचा प्रकल्पाला विरोध नसल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय. मात्र मुख्यमंत्र्यांनी कुणाशी चर्चा करून हे जाहीर केलं? असा सवाल शेतकरी विचारत आहेत. पर्यावरणवाद्यांनीही या प्रकल्पाला आपला विरोध जाहीरपणे व्यक्त केला आहे. 

सरकारकडून या प्रकल्पाबाबतची भूमिका स्पष्टपणे मांडली जात नाही. सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली नाही, तर शेतकऱ्यांचा हा संघर्ष वाढीला लागण्याची शक्यता आहे.