विधानसभेसाठी २४८-४० चा फॉर्म्युला; वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला अल्टिमेटम

येत्या १० दिवसात काँग्रेसने त्यांचे उत्तर द्यावे.

Updated: Jul 3, 2019, 05:58 PM IST
विधानसभेसाठी २४८-४० चा फॉर्म्युला; वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला अल्टिमेटम title=

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यातील समीकरणे बदलणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने आता विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसला अल्टिमेटम देण्यात आला आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला आम्ही ४० जागा सोडत आहोत. वंचित बहुजन आघाडी विधनसभेच्या २४८ जागांवर निवडणुक लढवेल. त्यांना मंजूर असेल तर त्यांनी येत्या १० दिवसात काँग्रेसने त्यांचे उत्तर द्यावे. काँग्रेसला चर्चा करायची असेल तर अधिकृतपणे आमच्या पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करावी, असे वंचित बहुजन आघाडीचे सरचिटणीस गोपीचंद पडाळकर यांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या नेत्यांनी शेवटपर्यंत वंचित बहुजन आघाडीशी युतीसाठी प्रयत्न केले होते. मात्र, ही युती प्रत्यक्षात येऊ शकली नव्हती. यानंतर लोकसभा निवडणुकीत वंचित फॅक्टरमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे पानिपत झाले होते. प्रकाश आंबेडकरांनी घडवलेल्या दलित-मुस्लिम एकीने आघाडीची मते मोठ्या प्रमाणात फोडली. प्रकाश आंबेडकरांनी सर्व ४८ मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले होते. त्यामुळे सहा मतदारसंघांमध्ये आघाडीचे उमेदवार पडले होते. यामुळे काँग्रेसच्या अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे या दिग्गज नेत्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला होता.

त्यामुळे लोकसभेतील परिस्थितीपासून धडा घेऊन काँग्रेस या प्रस्तावाला होकार देणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ही युती प्रत्यक्षात आल्यास राज्यातील जातीय समीकरणांवर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.