Raigad Tourist Dies: पावसाळ्याच्या दिवसात अनेकजण निसर्गाचा आनंद घ्यायला घराबाहेर पडतायत. अशावेळी जीव गेल्याच्या दुर्देवी घटनाही समोर येतात. अशीच एक घटना रायगडमधून समोर आलीय. रिव्हर राफ्टिंगनंतर एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलाय. कशी घडली ही घटना? सविस्तर जाणून घेऊया.
रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेऊन बाहेर पडत असताना एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी समोर आली. रायगड जिल्ह्यातील रोहा येथे ही घटना घडली आहे. अभिजीत कुलकर्णी असे या मृत पर्यटकाचे नाव असून ते बांद्रा येथील विज वितरण कंपनीमध्ये मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.
अभिजीत कुलकर्णी हे आपल्या कुटुंबासह कोलाड येथे पावसाळी पर्यटनासाठी आले होते. शनिवारी त्यांनी कुंडलिका नदी पात्रात रिव्हर राफ्टींग केली आणि नदी पात्रातुन बाहेर पडत असताना ते खाली कोसळले.
त्यांना लगेचच रोहा उपजिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी कुलकर्णी यांना मृत घोषित केले. या प्रकरणी कोलाड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून कोलाड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
रायगड जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर फिरायला येणार असाल तर सावधान. काही गडबड केलीत तर तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कारण जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. माणगाव तालुक्यातील ताम्हाणी घाट, सिक्रेट पॉइंट, देवकूंड धबधबा इथं हे प्रतिबंधात्मक आदेश जारी झाले आहेत. माणगावचे प्रांताधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी हे आदेश जारी केले आहेत. लोणावळा, खालापूर येथील दुर्घटनेनंतर प्रशासन जागे झाले आहे.
आता या ठिकाणी तुम्हाला निसर्गाचा आनंद घेताना जपून राहावे लागणार आहे. दारू पिणे, दारू पिऊन मौजमजा करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. खोल पाण्यात उतरणे, पाण्याच्या मोठ्या झोताखाली बसणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. धबधबे, दरी, धोकादायक वळणे या ठिकाणी सेल्फी काढणे, अतिवेगाने वाहने चालवणे यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.