Pune Rain Update: पुण्यात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. हवामान विभागाने पुण्यासह घटमाथ्यावर अलर्ट जारी केला आहे. येत्या काही तासांत आणखी मुसळधार पाऊस होऊ शकतो, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. तर, रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळं पुण्यातील रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. तर, सिंहगड रोडवरील सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. मात्र, यावेळी पुणेकरांनी एक वेगळाच दावा केला आहे. खडकवासला धरणामुळं सोसायट्यात पाणी शिरल्याचा दावा केला जात आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. त्यामुळं खडकवासला धरणदेखील पूर्ण क्षमतेने भरले आहे. खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे पुण्यातील सिंहगड रोडवरील नदीकाठच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आहे. एकता नगर परिसरातील पाच ते सहा सोसायट्या, रस्ते, दुकानं पाण्याखाली गेले आहेत. मध्यरात्री लोक झोपेत असताना पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
सोसायटीमध्ये पाणी शिरण्याचा धोका असल्याबाबतची कुठलीच पूर्व सूचना प्रशासनातून देण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अचानकपणे पाणी वाढल्याने 200 पेक्षा जास्त लोक पुराच्या पाण्यात अडकले होते. पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचलं आहे. दरम्यान सध्या खडकवासला धरणातून 35000 क्यूसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पाण्याचा विसर्ग रात्रीतून चारपट करण्यात आला आहे. त्यात आवश्यकतेनुसार घट किंवा वाढ होऊ शकते असं पाटबंधारे विभागाकडून कळवण्यात आलं आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा सकाळी 6:00वा. 35574 क्यूसेक्स करण्यात येत आहे. तसेच धरण परिसरात 100 mm व घाटमाथ्यावर 200 mm पेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.
- भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे .
- गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर .
- शितळा देवी मंदिर डेक्कन.
- संगम पूल पुलासमोरील वस्ती
- कॉर्पोरेशन जवळील पूल बंद करण्याची दक्षता घ्यावी.
- होळकर पूल परिसर