Pune Rain: पुणे पाण्यात! अजित पवारांचं पुणेकरांना आवाहन; म्हणाले, 'महत्त्वाच्या कारणांशिवाय...'

Pune Rain News Today: पुणे शहराबरोबरच ग्रामीण भागात बुधवार रात्रीपासूनच जोरदार पाऊस पडत असून याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवारांनी पुणेकरांना एक आवाहन केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 25, 2024, 09:25 AM IST
Pune Rain: पुणे पाण्यात! अजित पवारांचं पुणेकरांना आवाहन; म्हणाले, 'महत्त्वाच्या कारणांशिवाय...' title=
अजित पवारांनी केलं पुणेकरांना आवाहन

Pune Rain News Today: राज्याची राजधानी असलेल्या मुंबईसहीत महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना मान्सूनच्या पावसाने व्यापून टाकलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्रीपासून जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. पुण्यामध्येही बुधवार रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी काही फुटांपर्यंत पाणी साचलं आहे. पुण्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच, शहरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. असं असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांनी आपण परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचं म्हटलं आहे. अजित पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन रात्रीपासून सुरु असलेल्या पावसासंदर्भात एक पोस्ट केली आहे. "पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख श्री. सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला," असं अजित पवार म्हणाले आहेत. "खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने जिल्हा प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. गरज पडताच नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले," असंही अजित पवारांनी सांगितलं.

"पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनीही पावसाचा जोर कमी होईपर्यंत आवश्यक ती काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे माझे आवाहन आहे," असं अजित पवारांनी पुणेकरांना सांगितलं आहे.

हवामान खात्याचा पुण्यासंदर्भातील इशारा काय?

हवामान विभागाने पुढील काही तासांमध्ये पुणे शहर आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यात जोरदार ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व तालुक्यांबरोबरच खडकवासला परिसर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा आज रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी दिलेत. खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केले आहे.

कोल्हापूरमध्येही मुसळधार; पंचगगेची पातळी वाढली

पुण्याबरोबरच कोल्हापुरात पावसाने थैमान घातलं आहे. कोल्हापूरातही पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदी धोकापातळीच्या जवळ पोहोचली आहे.