आजोबांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावंडाचा बुडून मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

उपचारादरम्यान त्या दोन्ही भावांचा दुदैवी मृत्यू झाला. यामुळे नवले कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

Updated: May 23, 2024, 05:00 PM IST
आजोबांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावंडाचा बुडून मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना title=

Pabal Village young brothers drowned : आजोबांसोबत शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील पाबळमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आर्यन नवले आणि आयुष नवले अशी या दोन मुलांची नावं आहेत. ते दोघेही साधारण 13 वर्षांचे होते. दोन्हीही मुलांचा मृत्यूनंतर नवले कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आर्यन आणि आयुष यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.  

पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू

आर्यन नवले आणि आयुष नवले हे दोघेही आपल्या मामाच्या घरी उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्ताने फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने आजोबांसोबत दोघेही शेततळ्यावर गेले होते. यावेळी ते दोघेही पाण्यात पोहण्यासाठी शेततळ्यात उतरले. पण त्या दोघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते दोघेही पाण्यात बुडाले. यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने पाण्यातून बाहेर काढण्यात आहे. 

नवले कुटुंबियांवर शोककळा

या दुर्घटनेनंतर त्या दोघांनाही पाबळ या ठिकाणी असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्या दोन्ही भावांचा दुदैवी मृत्यू झाला. यामुळे नवले कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. त्यातच पाबळ गावातदेखील हळहळ व्यक्त केली जात आहे.

तीन दिवसात 15 जणांचा मृत्यू

दरम्यान इंदापूरमध्ये उजनी जलाशयात बोट पलटी होऊन सहा जण बेपत्ता झाले होते. यामध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांवर काळाने घाला घातला. यात पती-पत्नी आणि दोन चिमुकल्यांचा मृतांमध्ये समावेश आहे. सहा जणांपैकी 5 जणांचा मृतदेह सापडल्याची माहिती आहे. एका मृतदेहाचा शोध सुरू आहे. तर नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी येथील भावली धरणात बुडून 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या मृतांमध्ये दोन तरुण व तीन तरुणींचा समावेश आहे. हे सर्वजण रिक्षा घेऊन धरणावर फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी, रिक्षा धरणाजवळ उभी करुन ते पाण्यात पोहोण्यासाठी गेले असताना ही भीषण दुर्घटना घडली होती. त्यासोबतच नाशिकमधील मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीजवळ असलेल्या शासकीय आश्रमशाळेच्या परिसरातील एका विहिरीत विवाहित महिलेसह मुलीचा मृतदेह आढळून आले. त्यानंतर आता पुण्यातील पाबळमध्ये दोन सख्याभावांना मृत्यू  झाला आहे.