Pune Crime News: भंगार व्यवसायिकाच्या 14 वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली होती. मंगळवारी सकाळी या मुलाचे अपहरण करण्यात आले मात्र, अवघ्या तीन तासांतच पोलिसांनी या अपहरणाचा डाव हाणून पाडला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तीन तासांतच मुलाची सुटका केली आहे.
मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास तिघांनी मुलाला त्याच्या राहत्या घरासमोरुन उचलून नेले होते. त्यानंतर आरोपींनी मुलाच्या काकाला तीन वेळा फोन करुन 40 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. मुलाच्या अपहरणानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांना फोन केला होता. त्यानंतर पोलिसांना तात्काळ सूत्रे हलवत मुलाचा शोध सुरू केला. पोलिसांनी भंगार व्यावसायिकाच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तिघे आरोपी जबरदस्ती मुलाला कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले. त्यानुसार त्यांनी तपासाला सुरुवात केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या फोनवरुन खंडणीसाठी फोन येत होते तो नंबर आम्ही ट्रेस करण्यास सुरुवात केला. तेव्हा खंडणीखोर खेड शिवापूरहून सासवड येथे जात असल्याचे समोर आले. तेव्हा आम्ही ग्रामीण पोलिसांना राजगड आणि सासगड पोलिसांना फोन करुन घटनेबद्दल सांगितले. तसंच, मुलाच्या सुरक्षिततेसाठी आणि खंडणीखोर ताब्यात घेण्यास सुचवले होते.
पोलिसांनी रचलेल्या प्लाननुसार, कोडिट नाका येथे खंडणीखोरांना ताब्यात घेण्यात आले. तर, अपहरण करण्यात आलेल्या मुलाला सुखरुपपणे त्याच्या आई-वडिलांकडे सोपवण्यात आले. मुलाच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवघ्या चार तासात अपहरण करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या तिन्ही आरोपींकडून तीन मोबाईल, एक पिस्तूल, एक कोयता, एक सुरा, छत्री, हातोडा आणि मास्क असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी या तीन आरोपींनी मुलाचं अपहरण केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तेजस, अर्जुन आणि विकास अशी या तिघांची नावे आहेत. तर, या तिघांनी अपहरणासाठी मारुती झेन कार वापरली होती. पोलिसांनी ती कारही जप्त केली आहे.
मुलाच्या कुटुंबियांनी लगेचच पोलिसांना घटनेची माहिती दिल्यामुळं आरोपींना पकडणे आणि मुलाला सुखरुप सोडवणे शक्य झाले आहे. मुलगा हा आठवीत शिकत होता. गेल्या कित्येक दिवसांपासून आरोपी हे घराबाहेरुन त्याच्यावर नजर ठेवत होते. त्यानंतर मुलगा घराबाहेर खेळण्यासाठी बाहेर पडला असता आरोपींनी त्याचे अपहरण केले आहे. तसंच, वेळेत पोलिसांनी नाकाबंदी करुन आरोपींना रोखले आणि अवघ्या तीन तासांत आरोपीना पकडणे शक्य झाले.