अतिउत्साह नडला; राजगडावरुन सुवेळामाचीकडे जाताना तरुणाचा तोल गेला अन्....

Pune News : राजगड पाहण्यासाठी हा तरुण आला होता. राजगड किल्ल्यावरील बालेकिल्ला उतरुन तो सुवेळा माचीकडे जात असतानाच हा अपघात घडला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तरुणाला तात्काळ रुग्णालयता दाखल करण्यात आले आहे

Updated: Jan 23, 2023, 10:04 AM IST
अतिउत्साह नडला; राजगडावरुन सुवेळामाचीकडे जाताना तरुणाचा तोल गेला अन्.... title=

निलेश खरमारे, झी मीडिया, पुणे : पुण्यातील (Pune News) राजगड किल्ल्यावरील (rajgad fort) सुवेळा माचीवरील दुर्घटनेत गंभीर झालेल्या युवकाला वाचवण्यात पुरातत्व विभागाचे (Archaeology Department) कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांच्या तत्परतेने यश आलय. सुवेळा माचीवर (suvela machi) दगडावरून उडी मारताना पाय घसरून पडल्यानं मार लागून चैतन्य किरवे हा युवक गंभीर जखमी झाला होता.पुरातत्व विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांच्या तत्परतेने युवकाला गडावरील स्ट्रेचरच्या सहाय्याने गडावरून पायथ्याला आणत रुग्णालयात दाखलं केले आहे. वेळेत उपचार मिळाल्याने चैतन्यला वाचविण्यात यश आलं.

चैतन्य किरवे रविवारी दुपारी पुण्यातील राजगड किल्ल्यावरील पर्यटनासाठी आला होता. त्यावेळी राजगड किल्ल्यावरील बालेकिल्ला उतरुन तो सुवेळा माचीकडे जात होता. मात्र एका दगडावरुन उडी मारताना पाय घसरून पडल्याने त्याच्या डोक्याला जबर मार बसला. यामध्ये चैतन्यला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच मावळा जवान संघटनेच्या सदस्यांनी पुरातत्त्व विभागाशी संपर्क साधला. यानंतर कर्मचारी बापू साबळे, सुरक्षा रक्षक विशाल पिलावरे,आकाश कचरे यांनी तात्काळ गडावरील स्ट्रेचरच्या सहाय्याने चैतन्यला पायथ्याशी आणलं. यावेळी स्थानिक तरुणांनीही कर्मचाऱ्यांना मदत केली.

स्थानिक किरण शिर्के, रवि जाधव ,संदीप दरडिगे यांच्या मदतीने कर्मचाऱ्यांनी सुवेळा माचीवरुन चैतन्यला राजगडावरील शिवरायांच्या राजसदरेवर आणण्यात आले. तात्काळ 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेस संपर्क साधण्यात आला. रुग्णवाहिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल बोरसे आणि मदतनीस ओंकार देशमाने यांनी चैतन्यवर प्राथमिक उपचार केले आणि त्याला पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चैतन्यच्या डोक्याला जबर मार लागला असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे. स्थानिक युवक आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या तात्काळ मदतीमुळे चैतन्यचा जीव वाचला आहे, असे डॉ.बोरसे म्हणाले.

दरम्यान, याआधी राजगड किल्ल्यावर पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केल्यानंतर रोहिणी वरात नावाची महिली मधमाशांपासून जीव वाचवण्यासाठी पळत असताना किल्ल्यावरील खोल दरीत पडल्याने ती गंभीर जखमी झाली होती. मधमाशांच्या हल्ल्यात महिलेच्या पतीसह दहा पर्यटक जखमी झाले होते. सकाळच्या सुमारात मध्यमाश्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. दरीत कोसळल्याने रोहिणीच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती.