सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : सध्याच्या घडीला लग्नाचा (marriage) विचार करताना तरुण तरुणी आपला जोडीदार आपल्याला किती समजून घेतो याचा विचार नक्कीच करतात. त्यामुळे जोडीदार निवडताना आता जोडपी (Couple) सजूतदारपणा (Understanding) हा गुण देखील त्याच्या जोडीदारामध्ये आहे की नाही हे पाहताना दिसत आहेत. अशाच एका जोडप्याने लग्न करताना एकमेकांसमोर काही अटी ठेवलेल्या मान्य करत लग्नगाठ बांधली आहे.
पुण्याच्या (Pune News) आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील कृष्णा लंबे या तरुणाने जुन्नर तालुक्यातील सायली ताजनेसोबत लग्नगाठ बांधली. मंचर येथे या जोडप्याचा विवाहसोहळा पार पडला. मात्र या लग्नापेक्षा या जोडप्याने स्वाक्षरी केलेल्या एका करारनाम्याची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरुय. नवरदेवाने आणि नवरीने एकमेकांसमोर काही वेगवेगळ्या अटी ठेवल्या होत्या. सर्वांसमोर या जोडप्याने या अटी मान्य करत लग्न केल्याने सर्वांनीच त्यांचे कौतुक केले आहे.
या करारानाम्यामध्ये सहा प्रश्न ठेवण्यात आले होते. ते मान्य केल्यानंतर हा विवाहसोहळा पार पडला. विशेष म्हणजे या करारनाम्यवर साक्षीदार म्हणून त्यांच्या मित्र आणि मैत्रिणींनी स्वाक्षरी देखील केल्या आहेत. लग्नाच्या बंधनात अडकताना या नाव दाम्पत्याने एकमेकांसमोर अटी ठेवल्या होत्या. त्या मान्य करतच त्यांनी हा विवाह केला आहे. कृष्णा आणि सायलीच्या या अनोख्या करारनाम्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा असून तो तुफान व्हायरल होत आहे.
लग्नाच्या करारनाम्यात कोणत्या अटी आहेत?
* कृष्णा : सायलीचे म्हणणे नेहमी बरोबरचं असेल...!
* सायली : मी कृष्णाकडे शॉपींगसाठी हट्ट धरणार नाही...!
* सायली : मी कृष्णाला मित्रांबरोबर फिरायला, पार्टीलाजायला आडवणार नाही. (महिन्यातून दोन वेळा)
* कृष्णा : मी सायलीची आणि आई वडिलांची ही सेवा करेल...!
* सायली : मी कृष्णाचे मित्र घरी आल्यानंतर त्यांच्यासाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवेल...!
* आमच्यात वादविवाद झाले तरी ते आमचे आम्ही एक दिवसात मिटवू.