Shivsena : शाखा ताब्यात घेण्यावरुन शिंदे गट - ठाकरे गट भिडले, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात राडा

ठाण्यात लोकमान्य नगर शाखेसमोर शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक, शाखा ताब्यात घेण्यावरून दोनही गट भिडले, पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही कार्यर्त्यांना पांगवल्याची माहिती...

Updated: Feb 27, 2023, 07:03 PM IST
Shivsena : शाखा ताब्यात घेण्यावरुन शिंदे गट - ठाकरे गट भिडले, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात राडा title=

ठाणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयानंतर शिंदे गटाला (Shinde Group) शिवसेना (Shivsena) हे नाव आणि चिन्ह मिळालं आहे. या निर्णयानंतर शिंदे गटाकडून आक्रमक पवित्रा घेतला गेला आहे. ठाण्यात शिवसेनेच्या सर्व शाखा (Shivsena Shakha) आपल्या ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाचे कार्यकर्ते सरसावले आहेत. रविवारी रात्री उशिरा ठाण्यातील लोकमान्य नगर शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटाचे (Thackeray Group) कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दोन्ही कडील कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. 

याप्रकरणी ठाकरे गटाने ठाणे पोलीस आयुक्तांकडे (Thane Police Commissioner) निवेदन दिलं आहे. कोर्टात केस सुरु असून यावर अद्याप अंतिम निकाल लागलेला नाही, असं असताना अशा प्रकारे दडपशाही आणि दादागिरी करून शाखा ताब्यात घेण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाल्याचा आरोप खासदार राजन विचारे (MP Rajan Vichare) यांनी केलाय

तर दुसरीकडे शिंदे गटानेही वर्तक नगर पोलिस ठाण्यात (Thane Vartak Nagar Police Station) तक्रार दखल केलीय. शिवसेना हा पक्ष आणि धनुष्य बाण चिन्ह आम्हाला मिळाले असून उलट ठाकरे गटाने आमच्या पक्षचा गैरवापार केल्याचा आरोप शिंदे गटाने केलाय. दरम्यान ज्या शाखेवरून वाद निर्माण झलाय त्या शाखेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा फोटो असणारा बॅनर लावण्यात आला असून ठाकरे गटाचा आमच्या शाखेवर हक्क सांगण्याचा काहीही अधिकार नसल्याचा दावा शिंदे गटाने केलाय.

याआधी दापोलीत राडा
दरम्यान, याआधी शाखा घेण्यावरुन दापोलीत पहिली ठिणगी पडली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिला त्याच दिवशी दापोली शहरातील मूळ शिवसेना शाखा कोणाची यावरुन शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार राडा झाला होता. पक्ष आणि चिन्हाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागताच शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत शिवसेना शाखेजवळ धाव घेतली. यावेळी तिथे आधीपासूनच असलेल्या उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांदरम्यान धक्काबुक्की झाली.