Pune Fire : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाघोली (Wagholi) येथे एका गोडाऊनला भीषण आग (Fire) लागली असून या आगीत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बऱ्याच प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून कूलिंगचे काम सुरु करण्यात आले आहे. वाघोलीमध्ये रात्रीच्या सुमारास गोडाऊनला भीषण आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पीएमआरडीए वाघोली व पुणे महानगरपालिकेच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. काही वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
या भीषण आगीमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या तिघांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. दरम्यान आगीचं कारण समजू शकलं नसलं तरी तिघांचे मृतदेह ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत.
वाघोलीच्या उबाळे नगर येथे शुक्रवारी रात्री लग्नाच्या सजावटीचे सामान असलेल्या गोदामाला भीषण आग लागली. रात्री 11. 43 च्या सुमारास लागलेल्या आगीत चार सिलिंडरचा स्फोट झाला, ज्यामुळे भीषण आग लागली. यानंतर अग्निशमन दलाच्या नऊ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बराच वेळ ही आग धुमसत होती. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाला. सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.
एका अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, "अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणत 400 सिलिंडरचा साठा असलेल्या जवळच्या गोदामात आग पसरण्यापासून रोखली आहे. त्यामुळे मोठी घटना टाळली."
पिंपरी मध्ये बँक ऑफ बडोदाला आग
पिंपरी चिंचवड मध्ये खराळवाडी परिसरात असलेल्या बँक ऑफ बडोदाला रात्री दोनच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये कागदपत्र जळून खाक झाली असून दहा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नेमकं किती नुकसान झालं याचं बँक प्रशासन आढावा घेणार आहे.
"आम्हाला बँकेतील सुरक्षा रक्षकाकडून आग लागल्याचा फोन आला. आमचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बँकेचे अधिकारीही आले होते. त्यांनी कुलूप उघडले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे काम हाती घेतले. बँकेतील फर्निचर, दस्तऐवज आणि इतर साहित्य जळून खाक झाले," असे अग्निशम अधिकारी गौतम इंगवले यांनी सांगितले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही, पण प्रथमदर्शनी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची दिसत आहे.