महाराष्ट्राचे दोन जवान शहीद, संपूर्ण राज्यावर शोककळा

पुलवामा जिल्ह्यातल्या दहशतवादी हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातल्या दोन जवानांना वीरमरण आले आहे.  

Updated: Feb 15, 2019, 10:26 PM IST
महाराष्ट्राचे दोन जवान शहीद, संपूर्ण राज्यावर शोककळा title=

बुलडाणा : पुलवामा जिल्ह्यातल्या दहशतवादी हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातल्या दोन जवानांना वीरमरण आले आहे. चोरपांग्रा गावातल्या नितीन राठोड आणि मलकापूरच्या संजय राजपूत यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. त्यांच्या हौतात्म्यानं संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाशी लढताना बुलडाण्याच्या दोन सुपुत्रांनी देशासाठी बलिदान दिले. काश्मिरातल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात लोणारच्या चोरपांगरा गावातील नितीन राठोड आणि मलकापूरच्या संजय राजपूत यांना वीरमरण आले आहे. 

देशसेवेचा ध्यास घेऊन संजय राजपूत हे वयाच्या २३ व्या वर्षी सीआरपीएफमध्ये भरती झाले. वीस वर्षांचा सेवाकाळ झाल्यानंतर निवृत्ती घेण्याऐवजी देशसेवेचे व्रत घेतलेल्या राजपूत यांनी पाच वर्षांचा सेवाकाळ वाढवून घेतला होता. संजय राजपूत यांच्याप्रमाणं लोणार तालुक्यातील चोरपांगरा गावातील सुपूत्र नितीन राठोड शहीद झालेत. नितीन राठोड काही दिवसांपूर्वीच सुट्टीसाठी गावी आले होते. आठ दिवसांपूर्वी भेटलेला मित्र आज जगात नाही हा धक्का पचवणे त्याच्या नातेवाईक आणि मित्रांना कठीण झाले आहे. संपूर्ण चोरपांग्रा गावावर शोककळा पसरली आहे.

देशाच्या सीमांच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सह्याद्रीच्या सुपूत्रांची परंपरा, महाराष्ट्राच्या या वीर जवानांनीही कायम राखली आहे. या वीर जवानांना झी २४ तासचा सलाम. 

पुलवामातील शहीद जवानांचे पार्थिव दिल्लीत आणले. महाराष्ट्रातल्या वीरपुत्रांचे पार्थीव उद्या सकाळी नागपुरात आणणार आहेत. शहीद संजय राजपूत आणि नितीन राठोड यांच्यावर उद्या बुलढाण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सर्व शहिदांचे पार्थिव उद्या सकाळी आपापल्या मूळ ठिकाणी रवाना करण्यात येणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील दोन्ही जवानांचे पार्थिवही उद्या सकाळी पुण्याला दाखल होणार आहेत.