Pooja Khedkar Case Lady IAS Officer Comment: वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांना मसुरी येथील प्रशिक्षण केंद्रात उपस्थित राहण्यासंदर्भातील डेड लाइनला दोन दिवस उलटून गेल्यानंतरही त्यांचा कोणताही ठावठिकाणी नाही. सध्या पूजा खेडकर कुठे आहेत हे कोणालाही ठाऊक नाही. दिव्यांग असल्याचं खोट प्रमाणपत्राबरोबरच वडिलांची संपत्ती 40 कोटी असताना नॉन क्रिमी लेअर सर्टीफिकेट कसं मिळालं यासारख्या अनेक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर युपीएसीने पूजा यांना चौकशासाठी बोलावलं आहे. एकीकडे हे प्रकरण सुरु असतानाच दुसरीकडे पूजा प्रकरणाच्यासंदर्भातून भाष्य करणं अन्य एका महिला आयएएस अधिकाऱ्याला भारी पडत असल्याचं चित्र दिसत आहे.
दिव्यांग म्हणून प्रशासकीय सेवेमध्ये दिलं जाणारं विशेष आरक्षण सध्या पूजा खेडकर प्रकरणामुळे चर्चेत असतानाच आयएएस अधिकारी स्मिता सब्रवाल यांनी केलेल्या विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे. तेलंगणामधील वित्त आयोगाच्या सदस्या म्हणून कार्यरत असलेल्या स्मिता यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन उपस्थित केलेला प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. अनेकांनी ज्या पद्धतीने स्मिता यांनी या विषयावर भाष्य केलं आहे त्याला आक्षेप घेतला आहे. बऱ्याच जणांनी स्मिता यांना संवेदनशीलता नसल्याचंही म्हटलं आहे. तर काहींना अगदी स्वत:चं उदाहरण देत स्मिता यांना त्यांचं म्हणण कसं चुकीचं आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
"सध्या चर्चा सुरुच आहेत तर सर्व दिव्यांगांबद्दल संपूर्ण आदर बाळगत (मी हे लिहितेय) विमान कंपन्या अपंगत्व असलेल्यांना वैमानिक म्हणून नियुक्त करतात का? किंवा तुम्ही सुद्धा शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर दिव्यांग असेल तर त्यावर विश्वास ठेवाल का?" असा सवाल स्मिता यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन विचारला आहे. "ऑल इंडिया सर्व्हिस (आयएसएस/पीआयएस/पीएफओएस) सारख्या सेवांमध्ये प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन, अनेक तास सतत काम करणं, लोकांच्या तक्रारी थेट त्यांच्याकडून ऐकून घेणं यासारखी कामं असतात. यासाठी शारीरिक क्षमता फिटनेस हवाच," असा युक्तीवादही स्मिता यांनी केला आहे.
नक्की वाचा >> Pooja Khedkar प्रकरणाला वेगळं वळण! विचारही करणार नाही एवढा घोळ; मोदी सरकारकडून घटस्फोटाच्या चौकशीचे आदेश
तसेच पुढे बोलताना स्मिता यांनी, "एवढ्या महत्त्वाच्या सेवा देणाऱ्या विभागामध्ये हा (दिव्यांग) कोटा का दिला जातो?" असा प्रश्न स्वत: आयएएस अधिकारी असलेल्या स्मिता यांनी विचारला आहे.
As this debate is blowing up-
With all due respect to the Differently Abled.
Does an Airline hire a pilot with disability? Or would you trust a surgeon with a disability.The nature of the #AIS ( IAS/IPS/IFoS) is field-work, long taxing hours, listening first hand to…
— Smita Sabharwal (@SmitaSabharwal) July 21, 2024
यावरुन अनेकांनी आपली मतं मांडताना स्वत:ची उदाहरण देत आपण कशाप्रकारे केवळ शारीरिक दृष्ट्या दिव्यांग असतानाही काय काय मिळवलं आहे हे कमेंट सेक्शनमध्ये सांगितलं आहे. बऱ्याच जणांनी दिव्यांग कोट्यामधील जागाही मार्कांच्या आधारेच दिल्या जातात याची आठवण स्मिता यांना करुन दिली आहे. विशेष म्हणजे स्मिता यांनी या सर्व प्रतिक्रिया सकारात्मक पद्धतीने घेतल्या असून अनेकांना रिप्लायही केला आहे. पण एकंदरित कल पाहता स्मिता यांची विचार करण्याची पद्धतच चुकीची असल्याचं मत अनेकांनी नोदवलं आहे.
तुम्हाला या चर्चेसंदर्भात काय वाटतं कमेंट करुन नक्की कळवा.