टवाळक्या करणाऱ्यांवर कारवाई करा, गृहमंत्र्यांचे पोलिसांना आदेश

अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी जाणाऱ्यांवर कारवाई होत नाही

Updated: Mar 25, 2020, 03:00 PM IST
टवाळक्या करणाऱ्यांवर कारवाई करा, गृहमंत्र्यांचे पोलिसांना आदेश  title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यातही संचारबदी लागू असून कोणीही विनाकारण बाहेर न फिरण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तरीही काही नागरिक हे आवाहन जुमानत नसल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. यावर आता राज्याचे गृहखाते अधिक कठोर झालेले पाहायला मिळत आहे. सरकारचे आदेश न जुमानता टवाळक्या करणाऱ्यांना आता कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.  

नागरिकांना घरात बसण्याबाबत नागरिकांना वारंवार विनंती केली पण उपयोग झालेला नाही. अनेक जण टवाळक्या करत फिरत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. 

अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी जाणाऱ्यांवर कारवाई होत नाहीये. पण जे विनाकारण रस्त्यात गाड्या घेऊन फिरत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश पोलिसांना देण्यात आल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

११ जणांचा बळी  

कोरोना व्हायरसमुळे देशात आणखी एकाचा बळी गेला आहे. आतापर्यंत देशात ११ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तामिळनाडूत मदुराईमध्ये बुधवारी सकाळी ५४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे तामिळनाडूत झालेला हा पहिला मृत्यू अशी नोंद आहे. याबाबतची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री सी. विजयभास्कर यांनी दिली आहे. 

तामिळनाडूत मृत पावलेल्या या व्यक्तीला कोरोनासोबतच अनियंत्रित मधुमेह, हायपरटेंशनचा आजार होता. राजाजी रूग्णालयात या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूत कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १८पर्यंत आहे. मंगळवारी आणखी सहा नवीन रूग्ण आढळले आहेत. यात तीन महिलांचा देखील समावेश आहे.