मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमतींमुळे गेल्या काही दिवसांमध्ये सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलवरची एक्साईज ड्यूडी दोन रुपयांनी कमी केली त्यानंतर राज्य सरकारनं पेट्रोलवर दोन रुपयांनी आणि डिझेलवर एक रुपयांनी कर कमी केला.
पेट्रोल-डिझेलचे दर 43 रुपयांपर्यंत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी कल्पना दिली आहे. पेट्रोल आणि डिझेल जीएसटीमध्ये आणलं तर त्याचे भाव 43 रुपयांपर्यंत खाली येतील, असं फडणवीस म्हणाले आहेत. एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे. याआधी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही पेट्रोल-डिझेल जीएसटीमध्ये आणण्याची विनंती केली होती.
जर केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलवर जीएसटी लावण्यात आला तर त्यावर जास्तीत जास्त 28 टक्के कर लावण्यात येईल. एवढा कर लावल्यावर पेट्रोलची किंमत 43 रुपये तर डिझेलची किंमत 41 रुपयांपर्यंत खाली येईल.
इंडियन ऑईलकडून 4 सप्टेंबरला देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार एक लीटर पेट्रोलसाठी 26.65 रुपयांचा खर्च येतो. डीलरला कंपनी 30.13 रुपयांना पेट्रोलची विक्री करते. यावर डीलर 3.24 रुपयांचं कमीशन घेऊन पेट्रोलची किंमत 33.37 रुपये प्रती लिटर होते.
पेट्रोलच्या किंमतीवर केंद्र सरकार 19.48 रुपये एक्साईज ड्यूडी लावते. याआधी 21.48 रुपये एक्साईज ड्यूडी लावण्यात आली होती, पण ही ड्यूडी 2 रुपयांनी कमी करण्यात आली. यामुळे पेट्रोलची किंमत 52.85 रुपये होते, तर राज्य सरकार तब्बल 47.64 टक्के कर आकारते. यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात पेट्रोलची किंमत 76.18 रुपयांच्या आसपास होते.
पेट्रोलवर जीएसटी लावला तर 33.37 रुपयांच्या पेट्रोलवर जास्तीत जास्त 28 टक्के जीएसटी लावून ही किंमत 9.34 रुपयांनी वाढते म्हणजेच जीएसटी लावल्यावर पेट्रोल 43 रुपयांना मिळेल.
एक लीटर डिझेलसाठी कंपनी रिफायनरीजला 23.86 रुपये देते. हे डिझेल डिलरला 27.63 रुपयांना विकता येतं. यावर डीलरला 1.65 रुपये कमीशन मिळतं. डिझेलवरचे सगळे कर मिळून किंमत 60 रुपयांच्या पुढे जाते. डिझेलवरही जीएसटी लावला तर किंमत 41 रुपये प्रती लिटर होईल.