Raj Thackeray As CM Of Maharashtra Reactions: लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. महाराष्ट्र निर्माण सेना निवडणूक तयारी करत असून त्याचसंदर्भात राज्यातील लोकसभा निवडणूक मतदारसंघनिहाय मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यासंदर्भातील अहवाल पक्ष नेत्यांनी पक्ष प्रमुख राज ठाकरेंना सादर केला. या बैठकीनंतर मनसे नेते अभिजित पानसे यांनी राज ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी राज्यातील जनतेची इच्छा असल्याचं प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं. यावरुनच आता जवळजवळ सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीबाबत लोकांच्या, पदाधिकाऱ्यांच्या, मनसैनिकाच्या काय भावना आहेत यावर बैठका घेण्याचे राज ठाकरे यांनी निर्देश दिले होते. त्यावर आज नेत्यांनी राज ठाकरे यांना या बैठकींसंदर्भातील अहवाल दिला. राज्यातील जनतेचा मनसेला चांगला प्रतिसाद असल्याचे मनसे नेते अभिजित पानसे यांनी सांगितलं. पत्रकारांशी बोलताना अभिजित पानसे यांनी राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत असंही भाष्य केलं. "संपूर्ण महाराष्ट्रभर तयारी करण्याचे आदेश दिलेले आहेत. आम्ही सगळेच तयार आहोत. महाराष्ट्र सैनिक तयार आहेत. महाराष्ट्र सैनिकांपेक्षा महाराष्ट्राची जनता आता सन्माननिय राजसाहेबांना मुख्यमंत्री म्हणून बघत आहेत असं आम्हाला अनेक लोकांनी सांगितलं. आम्ही त्याच्या तयारीला लागलो आहोत," असं अभिजित पानसे म्हणाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिजित पानसे यांनी केलेल्या विधानावर खोचकपणे प्रतिक्रिया नोंदवली आहे. "ज्या ज्या पक्षातल्या ज्या ज्या लोकांना त्यांचे जे जे भावी मुख्यमंत्री वाटतात, त्या सगळ्या भावी मुख्यमंत्र्यांना माझ्या शुभेच्छा," असं फडणवीस यांनी पत्रकारांच्या राज ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं या विधानासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना म्हटलं.
"प्रत्येकाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटत असतं. त्यात गैर काय आहे? असा प्रतिप्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारला. तर आमदार निवडून आले तरच मुख्यमंत्री होता येतं, असा टोला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी लगावला आहे. "त्यांच्या मनात असेल तर त्यांना शुभेच्छा. लोकशाहीमध्ये जे निवडून येतात, ज्यांचा आकडा 144 क्रॉस करतो. त्यांचा मुख्यमंत्री होतो. त्यांचेही आमदार निवडून येवोत. आले तर ते मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राला आनंदच होईल. भाजपाला वाटतं त्यांचा मुख्यमंत्री व्हावा. राष्ट्रवादीला वाटतं अजित दादा व्हा. आमचा तर मुख्यमंत्री आहेच. आम्हाला वाटतं तेच रहावेत," असं संजय शिरसाठ म्हणाले. "प्रत्येकाला असं वाटतं, आमचा नेता मनातला मुख्यमंत्री आहे. खरा मुख्यमंत्री होईपर्यंत खूप मारामारी आहे. आमच्या मनात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्या आमचे देवेंद्रजीच झाले पाहिजेत अशी आमच्या प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण ते राजकीय परिस्थितीनुसार ठरवावं लागतं."