मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सर्वच पक्षात सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत बॅकफूटवर गेलेली काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत येण्याच्या प्रयत्नात आहे. तर भाजपा-शिवसेनेमध्ये नेत्यांचे इनकमिंग जोरात सुरु आहे. यातही भाजपात येणाऱ्या नेत्यांची संख्या जास्त आहे. या पार्श्वभुमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे. स्वार्थासाठीच इतर पक्षातील लोकं ही भाजपमध्ये येत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
भाजपात येणाऱ्या नेत्यांमध्ये वैयक्तिक स्वार्थ असला तरी सत्तेबरोबर राहिल्याने काम होतात, समाजासाठी उपयोगी पडता येत असल्याचा दृष्टिकोन असतो असेही त्यांनी स्पष्ट केले. सत्ताधारी पक्षाबरोबर किंवा निवडणुकीत यश मिळणाऱ्या पक्षाबरोबर जाण्याचा कल असल्याचे मतही पाटील यांनी व्यक्त केले आहे. भाजपमध्ये येण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनेकजण उत्सुक असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदार आणि नेत्यांनी शिवसेना-भाजपाची वाट धरली होती. त्याची पुनरावृत्ती 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर आता सुरू झाली आहे. सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर तर काठावर असलेले विरोधी पक्षातील आमदारही शिवसेना किंवा भाजपात जाण्याच्या निर्णयाप्रत पोहचू शकतील अशी शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये माढाचे आमदार बबनदादा शिंदे, बार्शीचे आमदार दिलीप सोपल, नगरचे आमदार संग्राम जगताप, अकोलेचे आमदार वैभव पिचड तर काँग्रेसच्या आमदारांमध्ये सिद्धाराम म्हेत्रे-अक्कलकोट, भारत भालके-पंढरपूर, बबनदादा शिंदे- माढा, अब्दुल सत्तार-औरंगाबाद, जयकुमार गोरे-सातारा, गोपालदास अग्रवाल- गोंदिया, सुनील केंदार-नागपूर हे देखील भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. भाजपा या तोडफोडीच्या राजकारणात यशस्वी ठरला तर काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी ही धोक्याची घंटा ठरु शकते.