Maratha Reservation : शिंदे सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढत मराठा आरक्षणाला मान्यता दिली आहे. त्यानंतर ओबीसी नेत्यांसह कायदे तज्ज्ञ यांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. सरकारच्या अधिसुचनेनुसार कुणबी जातप्रमाणपत्र मराठा समाजाला देता येणार आहे. त्यामुळे ओबीसी नेते यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बीडमध्ये (Beed News)भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patils) यांचं अभिनंदन करत एक आवाहन केलं आहे. त्या म्हणाल्या की, आता कुणबी प्रमाणपत्रे घेऊन मराठा समाजातील एक पिढी आता ओबीसीमध्ये आली आहे. आता त्या लोकांनी एक मराठा लाख मराठाऐवजी एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं, असं आवाहन त्यांनी जरांगेसह मराठा आंदोलनकर्त्यांना केलं आहे. (Pankaja Munde call for OBC reservation is a shock Ek Maratha Lakh Maratha now say one obc one lakh obcs of maratha reservation)
त्या पुढे म्हणाल्या की, सरकारने मराठा आरक्षणाबाबतीत काढलेल्या अध्यादेशाला 16 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या काळात काय आक्षेप येतील आणि ते कायद्यात बसतील का? हे पाहावे लागणार आहे. त्याशिवाय त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आली भूमिका स्पष्ट करत सांगितलं की, मराठा समाजाला कायद्यात बसणारे आरक्षण मिळाले पाहिजे ही माझी भूमिका कायम आहे. त्यामुळे जेव्हा या अध्यादेशावर शिक्कामोर्तब होणार तेव्हा खऱ्याअर्थाने अभिनंदन करावे लागणार आहे.
तर मराठा आरक्षणानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, मराठाला आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं वारंवार सांगण्यात येत होतं. मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलाच आहे अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली आहे.
त्या पुढे अशाही म्हणाल्या की, पूर्वी विदर्भातील लोकांनी आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांनाही कुणबी जातप्रमाणपत्र घेतले. मात्र मराठवाड्यातील नागरिकांनी ते कधीही घेतलं नाही. विदर्भ, पश्चिम महाराष्टातील लोकांसोबत मराठवाड्यातील लोकांनी तेव्हाच प्रमाणपत्र घेतलं असतं तर आजही परिस्थिती निर्माण झाली नसती. पण त्यांना आता पुढील पीढीसाठी कुणबी प्रमाणपत्र हवं आहे. त्यामुळे नाही नाही म्हणतानाही ओबीसीला धक्का लागलाच आहे. आता यापुढे दोन्ही समाजातील वितुष्ट संपुष्टात यावं आणि हा निर्णय टिकल्यास जातीवाचक भांडण होऊ नयेत, अशी अपेक्षाही पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली.