Pune Crime News: पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खराडी परिसरात पतीने पत्नीचा खून केल्याचे समोर आले आहे. इतकंच नव्हे तर पतीने पत्नीच्या खूनाचा व्हिडिओदेखील काढला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संपत्तीच्या वादातून पतीने पत्नीवर कात्रीने वार केले. त्यातच तिचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने खूनाचा व्हिडिओ तर काढलाच पण खून करुन स्वतः पोलिस ठाण्यातदेखील हजर झाला. या प्रकरणी पोलिसांनी खराडी पोलिस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे.
पतीचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यातूनच त्याने तिचा खून केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसंच, पत्नीने प्रॉपर्टी हडप केल्याचा संशयदेखील पतीचा होता. त्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. आरोपी पतीने पत्नीवर कात्रीने गळ्यावर वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला. पत्नीचा खून करुन पती स्वतःच पोलिसांसमोर हजर झाला. शिवदास गिते असं आरोपीचे नाव आहे.
शिवदास गीते हा मूळचा बीड येथील असून न्यायालयात टंकलेखक आहे. खडकी भागात तो भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत होता. काही दिवसांपासून या दाम्पत्यात कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता. बुधवारी पहाटे त्यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर शिवदासने घरातील शिलाई मशीनच्या कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर कात्रीने वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. तिने आरडाओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेतली. खराडी पोलिसांनी ज्योतीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मला मारायचा प्रयत्न केला हे मला उशिरा कळलं. मला माझ्या संरक्षणासाठी हा सगळा प्रकार करावा लागला. माझी इच्छा नव्हती तिला मारायची किंवा काही करावं. माझ्या घराची लक्ष्मी होती. या मुलीने माझ्या मुलाला जन्म दिला. तिचे सगळे भाऊ वाढीव आहेत. तिच्या भावाने मला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला माराव लागलं. मला या महिलेने मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता. या महिलेने तिचे माणसं पुण्यात पेरलेली आहेत, असं तो व्हिडिओत बोलताना दिसत आहे.