वर्गात गोंधळ घालतो म्हणून शिक्षकाची विद्यार्थ्याला वळ उठेपर्यंत मारहाण; पंढरपूरमधील धक्कादायक प्रकार

Pandharpur News : विद्यार्थ्यांना आयुष्याचे धडे देणाऱ्या शिक्षकाचा नराधमपणा पंढरपूरमध्ये समोर आला आहे. वर्गात गोंधळ घालतो म्हणून विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पंढरपूरच्या एका शाळेत समोर आला आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 10, 2023, 05:43 PM IST
वर्गात गोंधळ घालतो म्हणून शिक्षकाची विद्यार्थ्याला वळ उठेपर्यंत मारहाण; पंढरपूरमधील धक्कादायक प्रकार title=

सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : वर्गात मस्ती करतो म्हणून शाळेतल्या शिक्षकाने विद्यार्थ्याला जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पंढरपूरमध्ये (Pandharpur News) घडलाय. वर्गात गोंधळ घालतो म्हणून या विद्यार्थ्याला त्याच्या शाळेतील शिक्षकाने अंगावर वळ उमटे पर्यंत मारहाण केली आहे. पंढरपूर तालुक्यातील भाळवणी शाळेत हा सगळा खळबळजनक प्रकार घडला आहे. विद्यार्थ्याच्या आई वडिलांना हा प्रकार समजताच त्यांना धक्का बसला आणि त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठत शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस (Pandharpur Police) या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

मारहाण झालेला विद्यार्थी हा भाळवनीमधील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. शाळेत गोंधळ करतो म्हणून त्याचे शिक्षक अरुण नडगिरे यांनी त्याला मारहाण केली. गोंधळ घालतो या कारणासाठी शिक्षक अरुण नडगिरे यांनी विद्यार्थ्याला अंगावर वळ उठेपर्यंत लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीमुळे विद्यार्थ्याच्या अंगावर, पाठीवर, मांडीवर मारहाणीचे व्रण उठले आहेत. मुलाच्या पाठीवर मारहाणीचे व्रण दिसताच त्याच्या पालकांनी याबाबत चौकशी केली. त्यानंतर विद्यार्थ्याने सगळा घडलेला प्रकार सांगितला. हा सगळा प्रकार ऐकून मुलाच्या पालकांनी शिक्षकाच्या विरोधात पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पालकांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शिक्षकावर गुन्हा दखल करत तपास सुरु केला आहे.

उल्हासनगरच्या स्कायवॉकवर विद्यार्थ्यावर हल्ला

उल्हासनगरमध्ये एका विद्यार्थ्यावर जबर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. उल्हासनगरच्या स्कायवॉकवर नशेबाज गर्दुल्यांनी या विद्यार्थ्यावर हल्ला केला. विनय कनोजिया असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो क्लास संपून स्कायवॉकवरून घरी जात होता. याच वेळेस तीन अनोळखी तरुणांनी त्याला थांबवले. त्यानंतर त्यांनी विनयकडे मला तुझा फोन दे ,माझ्या मित्राला फोन करायचा आहे असे विनयला सांगितले.

मात्र विनयने त्यांना फोन देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी विनयला बेदम मारहाण करत त्याच्यावर हल्ला केला. या मारहाणीमध्ये विनयच्या तोंडाला जखम झाली आहे. याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र याप्रकरणी पोलिसांनी फक्त दखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली जाते आहे. या स्कायवॉकवर गर्दुल्यांचा कायम वावर असल्याने तिथे वारंवार असे प्रकार घडतात. मात्र पोलीस त्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मनात असल्याने पोलिसांवर टीका होत आहे.