मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद : राज्यात जिल्हा परिषद शाळांचा दर्जा खालावत चालला आहे. भरमसाठ फीस घेऊन सर्व सुविधा देणाऱ्या खासगी शाळांच्या संख्येत वाढ झाल्याने जिल्हा परिषद शाळांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही घट होत आहे. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील भाटशिरपुरा या गावात अशी जिल्हापरिषद शाळा आहे, जिथे मुलांना रविवारी सुद्धा जावंसं वाटतं. त्याच कारण ही तसंच आहे. या शाळेतील शिक्षक बोर्डावर कमी आणि स्मार्ट एलईडीवर जास्त शिकवतात. वर्गात स्पीकरवर सुरू असलेल्या युट्यूबवरून शिकवल्या जाणाऱ्या कविता, तल्लीन होऊन शिकवणारे शिक्षक त्यामुळे मुलं शाळेत रमून जातात.
वर्गात महागड्या टाईल्स, भिंतीवर आकर्षक चित्र, वर्गात प्रयोगाचे साहित्य, वर्गात एक नव्हे तर अनेक ब्लॅक बोर्ड ज्यावर विद्यार्थ्यांनी त्यांना सुचेल ते लिहायचं. वर्गाबाहेर चपला ठेवण्यासाठी स्वतंत्र स्टँड, हँडवाश स्टेशन. इतक्या सगळ्या सुविधा या शाळेत करण्यात आल्या आहेत. मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त कबड्डी, खो-खो, क्रिकेट मैदानही आहे. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बालकमंच ही तयार करण्यात आला आहे.
शाळेच्या परिसरात ३०० वृक्ष लागवड करण्यात आली आहे, ज्यांचं संगोपन शिक्षकांसह मुलंही करतात. सोबतच परसबागही तयार करण्यात आली आहे, जिथे सेंद्रिय पद्धतीने पालेभाज्या पिकवल्या जातात आणि त्याच पालेभाज्या पोषण आहारात मुलांना दिल्या जातात. त्याचबरोबर यंदा शाळेत नव्याने आलेल्या मुलांची रथात गावभर मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आलं. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही शाळेत यावसं वाटत, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत.
जिल्हापरिषद शाळा सध्या कात टाकत आहेत. पटसंख्या आणि गुणवत्तेचा टक्काही घसरत चालला आहे. त्यात भाटशिरपुरा या गावातील जिल्हापरिषद शाळा आदर्श शाळा म्हणून पुढे येत आहे. लोकसहभागातून आणि शिक्षकांच्या पुढाकाराने या सर्व गोष्टी साध्य झाल्या आहेत. लोकसहभागातून या शाळेला तब्बल ७ लाखांची मदत मिळाली. शिवाय या शाळेतील शिक्षक दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी १० हजार रुपये खर्च करतात. या शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या लग्न पत्रिकेत आहेर रोख स्वरूपात स्वीकारला जाईल, ही रक्कम जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यासाठी मदत म्हणून दिली जाणार आहे, अस ठळक अक्षरात लिहलं होतं. म्हणून पाहुणे मंडळींनी ही तब्बल ५० हजार रुपये आहेर केलं.
फक्त डिजिटल करून हे शिक्षक थांबले नाहीत तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर ही भर देत आहेत. दरवर्षी या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरत आहेत. शिवाय इतर उपक्रमांमध्येही ही मुलं चमकदार कामगिरी करत आहेत. म्हणूनच या शाळेला *अ* मानांकन ही देण्यात आलं आहे. प्रत्येक जिल्हापरिषद शाळेच्या शिक्षकांनी आणि जिल्हापरिषदेतील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला तर जिल्हापरिषद शाळांच रुपडं पालटल्याशिवाय राहणार नाही.