चेतळ कोळस, झी मीडिया, नाशिक : कांद्याच्या दरात (Onion Price) सातत्याने घट झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाला आहे. या प्रश्नी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आंदोलनाचा पवित्रा घेत लासलगाव (Lasalgaon) कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव (Onion auction) बंद पाडला आहे. तसेच कांद्याला मिळणाऱ्या बाजार भावाबाबत रोष व्यक्त केला आहे.
राज्यात सातत्याने कांद्याचे बाजार भाव पडत असल्याने आज पासून सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याप्रश्नी विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनामध्ये सरकारने कांद्याला 1500 रुपये क्विंटलचे अनुदान त्वरित जाहीर करावे तसेच आज जो कांदा तीन, चार, पाच रुपये किलो भाव लिलाव चालू असून तो त्वरित बंद करावा. या कांद्याला 15 ते 20 रुपये किलो भाव द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.
"सर्व शेतकऱ्यांच्या संमतीने कांद्याचे लिलाव बंद करण्यात आले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून विद्यमान सरकारवर विरोधी पक्षाने दबाव आणून कांद्याला सरसकट क्टिंटलला 1500 रुपयांचे अनुदान आजच जाहीर करावे आणि कांदा 15 ते 20 रुपये किलोने खरेदी करावा. नुकसानाचे अनुदान आणि आजचा भाव या गोष्टी मान्य झाल्या नाहीत तर कांद्याचा लिलाव सुरु होणार नाही," अशी आक्रमक भूमिका महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, भारत दिघोळे यांनी घेतली आहे.
कांद्याला कमीत कमी 1000 रुपये दर द्या
"आज पाचशे ते सातशे रुपये भाव मिळाला. आम्हाला काही परवडत नाही. 700 रुपये खर्च येतो कांद्याला. त्यामुळे कमीत कमी 1000 रुपये दर द्यायला हवा. शेतीमालाला भाव दिला पाहिजे. परवडत नसला तरी कांदा घरी ठेवून काय करणार? क्टिंटलला 700 ते 800 खर्च येतो. मार्च आल्याने कर्जही भरावे लागणार आहे," असे एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने म्हटले.
दरम्यान, जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत कांद्याचे लिलाव सुरू करणार नाही असा पवित्रा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी घेतला आहे.