सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : हिंदू कॅलेंडरनुसार, हिंदू नववर्षाची सुरुवात गुढी पाडव्याच्या (Gudi Padwa 2023) सणापासून होते. महाराष्ट्रात गुढी पाडवा या सणाला विशेष महत्व आहे. महाराष्ट्रात हा सण पारंपारिक पद्धतीने आणि जल्लोषात साजरा केला जातो. सर्वत्र गुढी पाढव्याची जय्यत तयारी सुरु आहे. नाशिकच्या (Nashik) गोदाकाठावर (Godavari river) 25,000 स्क्वेअर मीटर फुटांची भव्य रांगोळी काढण्यात आली आहे.
नाशिकमध्ये गुढी पाडवा सणानिमित्ताने गोदाकाटावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जातो. याचीच जोरदार तयारी सध्या सुरु आहे. नाशिकच्या गोदावरी काटावरील पाडवा पटांगणावर 25,000 स्क्वेअर मीटर फुटांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.
पर्यावरण रक्षण या अंतर्गत पंचमहाभूते या विषयावर ही रांगोळी काढण्यात आली आहे. नाशिक महापालिका आणि नववर्ष स्वागत समिती यात्रा यांच्या संयुक्त विद्यमाने ही रांगोळी साकारण्यात आली आहे. सकारात्मक ऊर्जेने मी ते आम्ही त परिवर्तन करणे हा या रांगोळी साकारण्या मागचा प्रमुख उद्देश आहे.
तब्बल २५००० स्वेअर फुट अशा या महारांगोळी साठी एकूण 2500 किलो रंग आणि 2000 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. 200 महिलांनी अवघ्या तीन तासांत ही महारांगोळी साकारली आहे. ही भव्य दिव्य रांगोळी पाहण्यासाठी नाशिककर गोदाकाठी मोठी गर्दी करत आहेत.