कुस्तीच्या महान परंपरेला गालबोट! इराणी पैलवानाला मारहाण करणाऱ्या माऊली कोकाटेवर कारवाई होणार?

सांगली महापौर चषक कुस्ती स्पर्धेत कुस्तीच्या महान परंपरेला गालबोट लागणारी घटना घडली. कुस्ती निकाल लागत नसल्याने एका भारतीय पैलवानाने विरोधी इराणी पैलवानाला चक्क मारहाण केली. या घटनेचे पडसाद भारतीय कुस्ती क्षेत्रात उमटत आहेत. 

Updated: Mar 20, 2023, 09:23 PM IST
कुस्तीच्या महान परंपरेला गालबोट! इराणी पैलवानाला मारहाण करणाऱ्या माऊली कोकाटेवर कारवाई होणार? title=

Action against Wrestler Mauli Kokate : सांगलीतल्या मानाच्या महापौर चषक कुस्ती स्पर्धेत एक दुर्देवी (Sangli Mayor Trophy Wrestling Copetition) प्रकार घडला. पुण्याचा नामांकित पैलवान माऊली कोकाटे (Mauli Kokate) आणि इराणचा कुस्तीगीर हमीद इराणी (Hameed Irani) यांच्यात कुस्तीचा डाव रंगला. पण कुस्ती ऐन रंगात आली असतानाच वादाचं गालबोट लागलं. तब्बल 1 तास 20 मिनिटं कुस्ती रंगली. दोन्ही पैलवान तुल्यबळ असल्यानं निकाल लागत नव्हता आणि अचानक एका क्षणी माऊली कोकाटेनं हमीद इराणीच्या डोक्यावर प्रहार केला. त्यानंतर त्यानं आणखी एक ठोसा लगावला. त्यामुळं इराणी पैलवाल सपशेल आडवा झाला. 

पुढच्याच क्षणी माऊलीनं त्याची पाठ टेकवून स्वत: विजेता असल्याचं भासवलं. मात्र माऊलीनं प्रतिस्पर्ध्याला केलेली ही मारहाण कुस्तीशौकिनांना अजिबात पटली नाही. त्यांनी माऊलीच्या कृतीला जोरदार विरोध केला. पंचांनीही माऊलीच्या कृतीला आक्षेप घेतला. चिडलेल्या प्रेक्षकांनी त्याची ही खेळी मान्य केली नाही. पंचांनी थेट प्रेक्षकांचा कौल घेण्याचं ठरवलं. अखेर प्रेक्षकांचा कौल लक्षात घेऊन ही कुस्ती बरोबरीत सुटल्याचं जाहीर करण्यात आलं.

हेही वाचा : Salman Khan ला कसला धोका? लॉरेन्स बिश्नोई गँग का उठलीय जीवावर... जाणून घ्या Inside Story

पुण्याच्या माऊली कोकाटे आणि इराणचा पैलवान हमीद इराणी यांच्यातील ही कुस्ती तब्बल एक तास वीस मिनिट सुरु होती. दोन्ही तुल्यबळ पैलवान माघार घेत नव्हते. कुस्ती निकाली निघत नसल्याने शेवटी माऊली कोकाटेचा संयम सुटला आणि त्याने हमीद इराणीला भर मैदानात मारहाण केली.

कुस्तीत शड्डू ठोकला जातो, डाव-प्रतिडाव टाकले जातात. धोबीपछाड टाकून समोरच्या पैलवानाला चारी मुंड्या चीत केलं जातं. पण लाल मातीत रडीचा डाव खेळला जात नाही. माऊली कोकाटेच्या वागणुकीमुळे कुस्तीशौकिनांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. कुस्तीच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे माऊलीला दंड करण्याची मागणी केली जातेय. याबाबत आता कुस्तीगीर परिषद काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.