गुरुकुंज मोझरीत निवासी डॉक्टरवर रात्री प्राणघातक हल्ला; डॉक्टरांची प्रकृती चिंताजनक

हल्लेखोरांनी केलेला हल्ला हा भयंकर

Updated: Nov 29, 2020, 09:18 AM IST
गुरुकुंज मोझरीत निवासी डॉक्टरवर रात्री प्राणघातक हल्ला; डॉक्टरांची प्रकृती चिंताजनक title=

अनिरूद्ध ढवळे, झी मीडिया, अमरावती : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यावर (Night Attack on Residential Doctor) अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला  केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथील श्री गुरुदेव आयुर्वेदिक रुग्णालयाच्या कॉर्टर मध्ये रात्री साडे बाराच्या सुमारास घडली. मनोज सांगळे असं प्राणघातक हल्ला झालेल्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव असून त्यांच्यावर सध्या अमरावतीमध्ये खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

दरम्यान घटनेचे माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी मधील श्री गुरुदेव आयुर्वेदिक रुग्णालय मध्ये मनोज सांगळे हे गेल्या अनेक वर्षांपासून निवासी वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहे. नेहमीप्रमाणे कालही रुग्णालयात आपले काम केल्या नंतर रुग्णालयातच असलेल्या त्यांच्या कॉर्टर मध्ये आराम करायला गेले. अशातच रात्री साडेबाराच्या सुमारास दवाखान्याचा मागील गेटमधून काही हल्लेखोरांनी आता शिरून त्यांच्यावर धारधार शस्त्राने जोरदार हल्ला चढवला व तिथून हल्लेखोरांनी पळ काढला. 

हल्लेखोरांनी केलेला हल्ला हा भयंकर असल्याने मनोज सांगळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. अशातच त्यांनी त्या रुग्णालयातील कर्मचाऱ्याला फोन करून झालेल्या धक्कादायक प्रकाराची माहिती दिल्यानंतर डॉक्टर मजोज सांगळे यांना उपचारासाठी तात्काळ अमरावतीला रवाना करण्यात आले आहे. सध्या अमरावती मधील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पहाटे चार वाजता घटनास्थळी धाव घेतली असून सध्या पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.