Ajit Pawar Confidential Meeting With PM Narendra Modi: राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) घटक पक्षांच्या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची बैठक झाल्याने त्याला अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची बैठक तब्बल 4 तास चालली. यामध्ये एकूण जुने नवे असे 38 पक्ष सहभागी होते. या बैठकीनंतर अजित पवार आणि पंतप्रधान मोदींमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची माहिती समोर आली आहे.
नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याबरोबर अजित पवार आणि प्रफुल पटेल यांनी चर्चा केली. या चर्चेमध्ये राजकीय विषयासोबत महाराष्ट्रातील काही विकास कामांच्या विषायावर चर्चा झाली. केंद्रीय सहकार मंत्रालयाची जबाबदारीही अमित शाहांकडे असल्याने अजित पवार यांनी यांच्याबरोबर सहकार विषयावर चर्चा केली. राज्यातील सहकारी संस्थांच्या अनुषंगाने केंद्रीय सहकार मंत्र्यांबरोबर अजित पवार यांनी चर्चा केली. या चर्चेत राज्यांतील अडचणीत आलेले कारखाने आणि एफआरपी या विषयावर चर्चा झाली. तसेच पुण्यातील मेट्रोसाठी 391 कोटी रुपयांची तर नागपूर मेट्रोच्या रखडलेल्या कामांसाठी 500 कोटी रुपये मिळावेत याबाबत अजित पवार यांनी केंद्रीय नेत्यांशी चर्चा केली. अजित पवार यांनी मुंबई-नाशिक हायवेवर पडलेले खड्डे तसेच ठाणे ते वडपे रस्ता दुरुस्तीबाबत देखील केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली.
शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांना भेटले होते. या भेटीनंतर मोदींना अगदी त्यांच्या कारपर्यंत सोडण्यासाठी अमित शाह, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार आल्याचं पहायला मिळालं. मोदी कारमध्ये बसल्यानंतर हे तिन्ही नेते एकमेकांशी बोलत बोलत पुन्हा हॉटेलमध्ये गेल्याचं दृष्य प्रसारमाध्यमांच्या कॅमेरांनी टीपलं. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या बैठकीला उपस्थित होते. एकनाथ शिंदेंबरोबरच अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी मोदी आणि शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे निघून गेले. मात्र त्यानंतर अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी मोदी आणि शाहांबरोबर बराच वेळ चर्चा केली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीतील या बैठकीला उपस्थित नव्हते.
नकारात्मक विचारांवर आधारलेली महाआघाडी देशात कधीही यशस्वी झाली नाही. घराणेशाहीबरोबरच भ्रष्टाचारी आणि घोटाळेबाजांच्या आघाडीमुळे देशाचे नुकसान होत असल्याची टीका या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी केली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने 9 वर्षामध्ये गरीब, मागास, वंचित आणि शोषितांच्या विकासासाठी काम केलं, असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं. भाजपाने 2019 मध्ये 303 जागा जिंकल्यानंतरही सरकार राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राहिले. यावरुनच सत्ता मिळवणे हे एनडीएचे कधीच लक्ष्य नव्हतं. आम्ही कधीच विरोधासाठी विरोध केला नाही. आम्ही कायमच सकारात्मक राजकारणाला पाठिंबा दिला. देशाला स्थैर्य देण्याबरोबरच विकासाला चालना दिल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.