Sharad Pawar: शरद पवारांचा निवृत्तीचा निर्णय मागे? कार्यकर्त्यांसमोर मोठी घोषणा; म्हणाले "उद्या..."

Sharad Pawar on Retirement: शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर समर्थक नाराज आहेत. राज्यभरातील कार्यकर्ते मुंबईत आंदोलन करत असून शरद पवार यांनी आज त्यांच्याशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.    

शिवराज यादव | Updated: May 4, 2023, 03:31 PM IST
Sharad Pawar: शरद पवारांचा निवृत्तीचा निर्णय मागे? कार्यकर्त्यांसमोर मोठी घोषणा; म्हणाले "उद्या..." title=

Sharad Pawar on Retirement: शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी अचानक निर्णय जाहीर केल्याने पक्षाच्या नेत्यांसह समर्थकांच्या भावना दुखावल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं बैठकांचं सत्र सुरु असून, दुसरीकडे संपूर्ण राज्यभरातील कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले असून आंदोलन करत आहेत. आजही कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर जमले असून, शरद पवार यांनी निर्णय घ्यावा अशी मागणी करत आहेत. शरद पवार यांनी आज या कार्यकर्त्यांशी संवाद साधला असून आपली भूमिका स्पष्ट केलं आहे.  

यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर कार्यकर्ते घोषणाबाजी करत असून शरद पवारांना निर्णय घेण्याची मागणी करत आहेत. जर निर्णय मागे घेतला नाही तर 6 मेपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही या कार्यकर्त्यांनी दिली आहे. यादरम्यान सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासह अनेक नेते येऊन कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच आज स्वत: शरद पवारांनी बाहेर येऊन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना आगामी लोकसभा निवडणूक तसंच इतर आव्हानं लक्षात घेता तुमच्या नेतृत्वाची गरज असल्याचं सांगितलं. कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्यानंतर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

"गेले दोन दिवस पक्षाच्या सगळ्या सहकाऱ्यांसोबत तुम्हीही तुमच्या तीव्र भावना व्यक्त करत आहात. कालदेखील आमची यासंबंधी चर्चा झाली आहे. तुम्ही सर्वजण महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून आला आहात. तुम्ही फार आग्रही दिसत आहात. पण मी जो निर्णय घेतला आहे, तो पक्षाच्या भवितव्यासाठी घेतला आहे. आम्ही भक्कमपणे मागे आहोत तोवर एक शक्तिशाली नेतृत्व उभं करावं असा त्यामागचा हेतू होता. पण असा असा निर्णय घेताना चर्चा करण्याची गरज असते हे खरं आहे. पण जर मी तुम्हा लोकांशी चर्चा केली असती तर तुम्ही हो म्हटलं नसतं याची मला खात्री होती. तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची गरज होती, पण त्यामागे एक हेतू होता," असं शरद पवारांनी यावेळी स्पष्ट सांगितलं. 

"मी निर्णय जाहीर केल्यानंतर फक्त महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरुनही अनेकजण आले आहेत. उद्या संध्याकाळी माझी त्यांच्याशी बैठक होणार असून चर्चा करणार आहे. चर्चा केल्यानंतर एक ते दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल. हा निर्णय घेताना तुमच्या भावना दुर्लक्षित केल्या जाणार नाहीत. दोन दिवसांनी तुम्हला असं बसावं लागणार नाही," असं आश्वासन यावेळी शरद पवारांनी दिलं आहे. म्हणजेच दोन दिवसांनी शरद पवार निवृत्ती मागे घेणार की नाही हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.