उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तसंच 15 वर्षं फोन करणारे आता मात्र फोन करुन विचारपूस करत आहेत. पण विचारपूस केली तरी भावूक होऊ नका असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. पुण्यात युवा मिशन 2024 महामेळाव्यात अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतही महत्वाचं विधान केलं.
या महामेळाव्यात धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांनी अजित पवारांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्धार बोलून दाखवला. तरुण पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करण्यास सांगितलं. पण अजित पवारांनी आपल्या भाषणातून सर्वांचे कान टोचले. जरा दमानं घ्या, थोडी कळ सोसा असा सल्ला अजित पवारांनी दिला. सारखं मुख्यमंत्री, मुख्यमंत्री करु नका. पहिल्यांदा आपली संघटना मजबूत करु असं आवाहन त्यांनी केलं.
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2004 ला आली. मुख्यमंत्रीपद का घेतलं नाही याच्या खोलात मी जात नाही. आर आर पाटील, छगन भुजबळ तेव्हा होते, मला त्यावेळी अपेक्षाही नव्हती. पण राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता. पण जरा दमानं घ्या, थोडी कळ सोसा. सारखं मुख्यमंत्री, मुख्यमंत्री करु नका. पहिल्यांदा आपली संघटना मजबूत करु. संघटना नाही तिथपर्यंत पोहोचवू," असं अजित पवार म्हणाले.
"आमच्या तरुणपणातील राजकारण वेगळं होतं. यापुढे त्यात अमूलाग्र बदल होत जातील. सोशल मीडियाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं आहे. आपण फार जागरुक राहण्याची गरज नाही. कारण नसताना कोणी बदनाम केलं तर तिथेच खंडन केलं पाहिजे. हा काय म्हणेल, कोणाचा निरोप येईल, अध्यक्ष कळवतील याची वाट पाहू नका. तरुणांनो राजकारणात काम करत असताना तत्परता उपजतच असली पाहिजे. एखादी घटना घडली तर त्या संदर्भातील प्रतिक्रियेसाठी निरोपाची वाट पाहू नका. पण असं करता त्यातून पक्षाची बदनामी होणार नाही, भावना दुखावल्या जाणार नाहीत, कोणाला त्रास होणार नाही, कायदा हातात घेतला जाणार नाही, संविधानाचा आदर राखला जाईल याची काळजी घ्या," असं
"भाजपासह का गेलो हे सारखं उकरुन काढायचं नाही. आपल्याला विकासावर, तरुण शक्तीवर लक्ष द्यायचं आहे. दोन महिन्यांनी लोकसभा निवडणूक आहे. महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आपला युवक कमी पडता कामा नये. विधानसभा निवडणुकीत एखाद्या तरुणात स्पार्के असेल, काम करण्याची चिकाटी असेल, तसंत जाती-धर्मांना आदर देत काम करत असेल त्यांचा विचार करु शकतो," असं अजित पवार म्हणाले.
"आज 50-52 आमदार पाठिंबा देतात याचाच अर्थ त्यांच्या मनात खदखदत होतंय. त्यांचे विचार, भूमिका होती पण वरिष्ठ समजून घेत नव्हते. समजून घेत असल्याचं दाखवत होते, पण निर्णय घेत नव्हते. त्याकरिता नाईलाजास्तव हा निर्णय घेतला. पण त्यातून अवमान करण्याची, कमीपणा दाखवण्याची भूमिका नव्हती," असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
"नरेंद्र मोदींना पर्याय नाही. तिसऱ्यांदा आपल्याला त्यांना पंतप्रधानपदी बसवायचं आहे. त्यांच्याकडे व्हिजन आहे. 18 तास ते काम करतात. त्यांनी अनेक विमानतळं, राष्ट्रीय महामार्ग, पूल, बंदरं उभी केली आहेत. पाण्याचे प्रश्न सुटत आहेत, 2 कोटी लोकांना घऱं, 80 कोची जनतेला मोफत अन्धान्य देण्याचा कार्यक्रम आहे. शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे. परकीय गुंतवणुसीाठी भक्कम स्थान निर्माण केलं आहे हे नाकारत येत नाही. त्याचा फायदा आपल्या देशाला, महाराष्ट्राला करुन घ्यायचा आहे," असंही त्यांनी सांगितलं.