राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का; मालेगावमध्ये २० नगरसेवकांचा पक्षाला अलविदा

राष्ट्रवादी काँग्रेसचे वाजले तीनतेरा

Updated: Aug 2, 2019, 08:47 PM IST
राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का; मालेगावमध्ये २० नगरसेवकांचा पक्षाला अलविदा title=

नाशिक: पक्षातील बड्या नेत्यांनी सोडचिठ्ठी दिल्याने घरघर लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला शुक्रवारी आणखी एक मोठा धक्का बसला. मालेगावचे माजी आमदार मुफ्ती इस्माईल यांच्यासह महानगरपालिकेतील २० नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. या सगळ्यांनी पत्रकार परिषेदत याचे कारणही स्पष्ट केले. 

राज्यसभेत नुकतेच तिहेरी तलाकविरोधी विधेयक मंजूर झाले. मात्र, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार चर्चेला अनुपस्थित होते. त्यांनी चर्चेला हजर राहून विधेयकाला विरोध न केल्यामुळे आपण पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे या नगरसेवकांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये सचिन अहिर, चित्रा वाघ, मधुकर पिचड, वैभव पिचड आणि शिवेंद्रराजे भोसले हे नेते राष्ट्रवादीतून बाहेर पडले होते.

दरम्यान, या नगरसेवकांनी आपण कोणत्या पक्षात प्रवेश करणार, हे अद्यापही स्पष्ट केलेले नाही. आमदार मुफ्ती इस्माईल या नगरसेवकांचे नेतृत्त्व करत आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मालेगाव महानगरपालिकेच्या २०१७ साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला २० जागांवर विजय मिळाला होता. तर काँग्रेसला २८, शिवसेना १३, भाजप ९, एमआयएम ७, जनता दल ६ आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. 

या निवडणुकीत भाजपने मुस्लिमबहुल पूर्व भागात २९ मुस्लिम उमेदवार देण्याची खेळी खेळली होती. मात्र, त्यावेळी ही चाल सपशेल अयशस्वी ठरली होती.