मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडी चौकशी सुरु आहे. आज सकाळी साडे सहा वाजता नवाब मलिकांच्या घरी ईडीचे अधिकारी पोहोचले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आणि मंत्र्यांकडून प्रतिक्रिया येत आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले भाजपकडून सूडाचे राजकारण सुरु आहे.
कधी शिवसेनेच्या तर कधी राष्ट्रवादीच्या नेत्यांना नोटीस द्या, असे प्रकार सुरु आहेत. हे 20 वर्षांपूर्वीचे प्रकरण आहे. कारवाई करायची होती तर त्यावेळीच करायला हवी होती. दहा वर्षे झाले मलिक सत्तेत आहेत, मग ही कारवाई आता अचानक का? ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही, तिथे असे उद्योग भाजपकडून (BJP) करण्यात येत आहेत, असा आरोप मुश्रीफ यांनी केला.
भाजपला सत्ता गेल्याने आलेली अस्वस्थता, वैफल्यग्रस्त यामुळे ते असे करत आहेत. भीती घातल्याने सत्ता येईल , असे भाजपला वाटत आहे. त्यामुळे ईडीचा वापर करुन भाजपकडून सूडाचं राजकारण सुरु असल्याची टीकाही मुश्रीफ यांनी केली.
ईडीचे अधिकारी 6.30 वाजता घरी गेलेत. त्यानंतर मलिकांना ईडीच्या ऑफिसमध्ये हजर राहण्यास सांगितले. मलिक सकाळी साडे सात वाजता ईडी ऑफिसमध्ये चौकशीसाठी पोहोचले. अद्याप त्यांची चौकशी सुरु आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी मलिकांची चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकरने ईडीची चौकशी केल्यानंतर मलिकांना समन्स बजावल्याचं बोललं जात आहे. मलिकांचं आणि अंडरवर्ल्डचे कनेक्शन आहे का? याबाबत चौकशी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान भाजपा व्यतिरिक्त सर्व पक्षासाठी ईडी आहे का असा सवाल करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजप नेत्यांची आम्ही सगळी प्रकरणे ईडीकडे देणार आहोत, असे ते म्हणाले. 2024 नंतर आम्ही सुध्दा तुमच्या मागे अशा तपास यंत्रणा लावू, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.