स्टेडिअमचं बांधकाम लवकर व्हावं म्हणून दिला बोकडा बळी; नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेचा प्रताप

Nashik News : नाशिकमध्ये सिडको येथील राजे संभाजी स्टेडियमच्या विस्तारीकरणाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी माजी नगरसेवकांना स्टेडिअमच्या प्रांगणात होमहवन, पूजा-अर्चा करत बोकडाचा बळी दिला आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 13, 2023, 09:32 AM IST
स्टेडिअमचं बांधकाम लवकर व्हावं म्हणून दिला बोकडा बळी; नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेचा प्रताप title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : पुरोगामी महाराष्ट्रात आजही अंधश्रद्धेला बळी पडणाऱ्यांची संख्या कमी नाही. राजकीय नेत्यांकडूनच अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याच्या घटना समोर येत आहेत. असाच काहीसा प्रकार नाशिकमध्ये (Nashik News) घडला आहे. नाशिक शहरातील सिडकोतील राजे संभाजी स्टेडियमचे (Raje Sambhaji Stadium) काम विना विघ्न पार वावे म्हणून माजी नगरसेविकेने (ex corporator) स्टेडियममध्ये चक्क बोकड बळी दिल्याची घटना घडली आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांनीही रोष व्यक्त केला आहे. तर अंधश्रद्धेच्या प्रथेविरुद्ध काम करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेदेखील (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti) याबाबत निषेध नोंदवला आहे.

नाशिक शहरातील सिडकोतील राजे संभाजी स्टेडियमच्या विस्तारीकरणाचे काम विना विघ्न पार पडावे म्हणून माजी नगरसेविकेने स्टेडियममध्ये चक्क बोकडाचा बळी दिला आहे. नुकताच महापालिका आयुक्तांनी दोन कोटी 93 लाखांचा निधी स्टेडियमच्या कामांसाठी मंजूर केला होता. त्यानंतर ठाकरे गटाच्या नगरसेविकेने बोकडाचा बळी दिला. या बोकड बळीने संतप्त होऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. नवसापोटी बोकड बळी ही निखालस अंधश्रद्धा असल्याचं संतांनी ही सांगितले आहे. लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचे काम राजकीय माध्यमातून होत असल्याची टीका करण्यात आली आहे.

"नाशिकच्या सिडकोमधील एक काम भूमीपूजन होऊनही वर्षानुवर्षे पूर्ण होत नव्हते. म्हणून तिथल्या माजी नगरसेवकांनी हे काम लवकर पूर्ण व्हावे म्हणून बोकड बळी देण्याचा घाट घातला. ही बातमी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला कळाली. खरंतर अशा प्रकारचे काम का पूर्ण होत नाही याची वस्तुनिष्ठ कारणे शोधली पाहिजे आणि काम पूर्ण केले पाहिजे. मात्र तसे न करता त्यासाठी अशा प्रकारचा दैवी आणि अवैज्ञानिक तोडगा करणे आणि बोकड बळी देणे हे लोकांना अंधश्रद्धेकडे घेऊन जाणारं आहे," अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिली आहे.

सिडकोमध्ये 15 वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेने राजे संभाजी क्रीडा संकुलाची निर्मिती केली होती. 2020 मध्ये‘खेलो इंडिया’अंतर्गत स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांतून सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन झाले होते. मात्र नूतनीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यांतच बंद पडले. यानंतर  लॉकडाउनमुळे दोन वर्षे काम बंद होते. त्यामुळे तीन ते चार वर्षांपासून नूतनीकरण रखडले होते. त्यानंतर आता काम लवकर पूर्ण व्हावं यासाठी माजी नगरसेविकेने स्टेडिअमच्या प्रांगणात थेट होमहवन, पूजा-अर्चा करीत चक्क बोकडाचा बळी दिला आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x