राज्यात कधी परतणार जोरदार पाऊस? जाणून घ्या अपडेट

Maharashtra Rain: 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पुन्हा एकदा राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या आठवड्यात विदर्भ आणि कोकणात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येथे पावसाचे जोरदार पुनरागम होण्याची शक्यता आहे

Pravin Dabholkar | Updated: Aug 13, 2023, 06:30 AM IST
राज्यात कधी परतणार जोरदार पाऊस? जाणून घ्या अपडेट  title=

Maharashtra Rain: जुलै महिन्याच्या शेवटाला जोरदार बॅटिंग करुन गेलेला पाऊस ऑगस्ट महिन्यात गायब झालेला दिसतोय. राज्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडतोय. पण पावसाळा सुरु असताना जोरदार पावसाच्या सरी कधी पाहायला मिळणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ही अपडेट तुमच्यासाठी आहे. हवामान खात्याने यासंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. 

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या आठवड्यात देखील पावसाची स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तुरळक प्रमाणात पाऊस पाहायला मिळू शकतो. पण जोरदार पावसाची वाट पाहणाऱ्यांना 18 ऑगस्टपर्यंत वाट पाहायला लाहू शकते.

राज्यात 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या आठवड्यात राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर अनेक जिल्ह्यांतही विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा कोसळायला सुरुवात करेल.

25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पुन्हा एकदा राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या आठवड्यात विदर्भ आणि कोकणात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येथे पावसाचे जोरदार पुनरागम होण्याची शक्यता आहे.असे असले तरीही मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरी इतका किंवा त्यापेक्षा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. 

दरम्यान 13 ते 17 ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रात मोठा पाऊस पडणार नाही. मध्य महाराष्ट्रासहित पश्चिम आणि दक्षिण भारतात मोठ्या पावसाच्या शक्यतेचे प्रमाण कमी असणार आहे.

जुन, जुलैमध्ये पडलेल्या पावसामुळे शहरात पाणी पुरवठा करणारे अनेक ठिकाणचे तलाव भरले आहेत. पण पाऊस सतत पडत राहणे आवश्यक आहे. शहरातील नागरिकांवर पावसाचा थेट परिणाम होत नसला तरी शेतकऱ्यांना पिकासाठी पावसावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे कमी पावसाचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसू शकतो. लाखो शेतकऱ्यांची शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पाऊस गायब झाल्यास त्यांच्या उत्पादनात घट येऊ शकते अशी भीती आता व्यक्त करण्यात येत आहे.