दोन महिन्यात नारायण राणे यांचे मंत्रिपद जाणार; वैभव नाईक यांचा गौप्यस्फोट

Vaibhav Naik on Narayan Rane: गेल्या काही दिवसांपासून आमदार वैभव नाईक हे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. माझ्यासोबत असलेल्या नागरिकांच्याही चौकश्या केल्या जात असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला होता

Updated: Mar 13, 2023, 11:10 AM IST
दोन महिन्यात नारायण राणे यांचे मंत्रिपद जाणार; वैभव नाईक यांचा गौप्यस्फोट title=

उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसांपासून कोकणातलं राजकारण चांगलंच तापल्याचे दिसत आहेत. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात असून विरोधककांकडूनही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आमदार आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्यावर 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असो किंवा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांची अटक असो. यावरुन कोकणात जोरदार राजकारण सुरु आहे. अशातच ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांवर निशाणा साधला आहे. ईडीच्या कारवाईवरुनही नाईक यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे.

येत्या दोन महिन्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे मंत्रिपद जाणार असल्याचा गौप्यस्फोट कुडाळ मालवण आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केलाय. आता पर्यंत इतरांचं राजकीय अस्तित्व ठरवणाऱ्या राणे यांचे राजकीय अस्तित्व भाजप ठवरणार आहे. भाजपला आता राणेंची राजकीय दृष्ट्या गरज नसल्याने त्यांना आता पदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याचे सांगत वैभव नाईक यांनी राणेंना डिवचलं आहे. कणकवली येथे पत्रकार परिषदेत वैभव नाईक यांनी हे भाकित वर्तवले आहे.

नितेश राणेंनी आधी वडिलांना विचारावं

"नितेश राणे यांनी अगोदर आपल्या वडिलांना विचारावं की त्यांना ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी पक्ष का बदलला? त्यांना आलेल्या ईडीच्या नोटीसचं पुढे काय झालं? वडिलांनी नेमका कोणता समजोता केला ? हे अगोदर जनतेसमोर आणावं आणि मग इतरांना उपदेश करावा," अशी टीका वैभव नाईक यांनी केली आहे. 

दरम्यान, याआधीही ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी अशाच प्रकारचा दावा केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री नारायण यांना फैलावर घेत त्यांचे मंत्रिपद काढून घेण्याची धमकी दिल्याचा दावा  खासदार विनायक राऊत यांनी केला होता. "नारायण राणेंच्या सचिवाने अनेकांना गंडा घातला आहे. हे कारनामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर गेले. त्यामुळे त्यांनी राणेंना चांगले फैलावर घेत या सचिवाला काढून टाकण्याच्या सूचना दिल्या. अन्यथा तुमचे मंत्रिपद काढू, असा इशारा दिला आहे," असा दावा विनायक राऊत यांनी केला होता.