अजब कारभार! मोठं नुकसान झालेल्या तालुक्यालाच पीक नुकसानीच्या अहवालातून वगळले

Chhatrapati Sambhajinagar : महत्त्वाची बाब म्हणजे  राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याच सोयगाव तालुक्याला अवकाळी पावसाच्या नुकसानीतून वगळण्यात आलंय. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व प्रकारानंतर शेतकरी संतापला असून सरकारच्या कारवाईकडे डोळे लावून बसला आहे

Updated: Mar 12, 2023, 02:39 PM IST
अजब कारभार! मोठं नुकसान झालेल्या तालुक्यालाच पीक नुकसानीच्या अहवालातून वगळले title=

नितेश महाजन, झी मीडिया, संभाजीनगर : हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणासह आलेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal rain) शेतकऱ्यांचे मोठं नुकसान केले आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. राज्याच्या अनेक भागाव वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीठ झाल्याने उभं पीक सपाट झालं आहे. यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आला आहे. सरकारने मदतीचे आश्वासन दिलं असलं तरी संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अवकाळी पावसाने आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाना मदत करण्याचे आश्वासन देत तातडीने पीक नुकसानाची पाहणी करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार कामसुद्धा सुरु झाले आहे. मात्र राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याच सोयगाव तालुक्याला अवकाळी पावसाच्या नुकसानीतून वगळण्यात आलंय.

स्थानिक प्रशासनाने अर्थात तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पीक नुकसानीच्या अहवालात सोयगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शून्य टक्के नुकसान झाल्याचा अहवाल दिलाय. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे. धक्कादायक बाब म्हणजे सोयगाव तालुक्यातदेखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे प्रशासनाने बांधावर जाऊन पंचनामे न करता एसी केबिनमध्ये बसूनच पंचनामे केले की काय असा प्रश्न या अहवालावरून उपस्थित झालाय. दुसरीकडे कृषीमंत्री असलेले अब्दुल सत्तार या अहवालाबाबत काय प्रतिक्रिया देतात याकडे आता लक्ष लागलंय.

कृषीमंत्र्यांच्या तालुक्यात आठवड्यात तीन आत्महत्या

एकीकडे अवकाळी पावसाने तडाखा दिलेला असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या तालुक्यात एकाच आठवड्यात तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुसरीकडे गेल्या आठवड्याभरात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक आत्महत्या या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात झाल्या आहेत.  सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील शेतकऱ्याने विहीरीमध्ये उडी घेत आत्महत्या केली आहे. 

अवकाळीमुळे किती नुकसान?

राज्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्यभरातील 13,729 हेक्टरवरील पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती. मात्र कृषी विभागाने 38,563 हेक्टरवरील काढणीला आलेली रब्बी पिके, फळबागा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.