मुंडे भगिनी भाजपमध्ये नाराज? पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मी भाजपची पण भाजप माझी थोडीच, असं सूचक विधान पंकजा मुंडें यांनी केले आहे.  राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

वनिता कांबळे | Updated: Jun 1, 2023, 09:04 PM IST
मुंडे भगिनी भाजपमध्ये नाराज? पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण title=

Maharashtra Politics :  भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी पुन्हा एकदा नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. मी भाजपची पण भाजप माझी थोडीच आहे. असं सूचक विधान पंकजा मुंडे यांनी केले आहे. गोपीनाथ मुंडेंनी पक्षासाठी खूप काम केले. त्यामुळेच आज सरकार पाहायला मिळतंय असंही त्यांनी बोलून दाखवल त्यामुळे पंकजा मुंडेंच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. मात्र, पंकजा मुंडेंच्या वक्तव्याचा संपूर्ण विपर्यास केला जात असल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटल आहे.

पंकजा मुंडे यांनी  नाराजीला मोकळी वाट करून दिली

भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा आपल्या नाराजीला मोकळी वाट करून दिली. निमित्त होतं राष्ट्रीय समाज पक्षाकडून आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीचं. मी भाजपची, पण भाजप थोडीच माझी आहे, असं वक्तव्य त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत केला. त्यामुळं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

काही मिळालं नाही तर मी ऊस तोडायला जाईन

एवढ्यावरच पंकजा मुंडे थांबल्या नाहीत. काही मिळालं नाही तर मी ऊस तोडायला जाईन असंही म्हणाल्या. विशेष म्हणजे दिल्लीतील महिला कुस्तीपटूंचं आंदोलन आणि शेतकरी सन्मान योजनेवरून कालच प्रीतम मुंडेंनी देखील भाजपला घरचा आहेर दिला होता.

गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार असलेल्या दोन्ही भगिनींनी भाजपविरोधात सूर लावले आहेत. मात्र, त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचं भाजप नेतृत्वाचं म्हणणं आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपनं पंकजा मुंडेंना कुठलीही मोठी जबाबदारी दिलेली नाही. त्यांचं राजकीय पुनर्वसनही केलेले नाही. त्यामुळं अधूनमधून त्यांची नाराजी उफाळून येते. मात्र यावेळी पंकजांच्या साथीला प्रीतम मुंडे देखील पुढं आल्यात. निवडणुकांसाठी जेमतेम वर्ष बाकी असताना मुंडे भगिनींनी असा पक्षविरोधी पवित्रा घेण्याचं कारण काय, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.