मुंबईः मुंबईतील एक महत्त्वाचा पूल लवकरच नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. या पुलाचे जवळपास 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळं बाप्पाच्या आगमनाबरोबरच हा पुलही नागरिकांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. लोअर परेलचा डिलाइल पुलाचा दुसरा टप्पा गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर खुला होणार असल्याची माहिती समोर येतेय. यापूर्वी मुंबई महानगरपालिकेने 15 जुलै आणि 31 जुलैपर्यंत सुरु करण्यात येण्याचे सांगितले होते. मात्र, पुलाचे काम वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने पुन्हा एकदा तारीख पुढे ढकलली गेली.
जुलैमध्येच हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार होता. मात्र मुसळधार पावसामुळं काम 20 दिवस उशीरा झाले. पुल बांधण्यासाठी लागणारे साहित्य उशीरा आल्याने पूलाचे काम पूर्ण होण्यास वेळ लागला. त्यामुळं हा पुल आता ऑगस्ट अखेरीस आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. पुलाचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. जवळपास पाच वर्षे वाट पाहिल्यानंतर डिलाइल पुलाचा पहिला हिस्सा 3 जून 2023मध्ये खुला झाला झाला होता. मात्र, याचा फारसा फायदा नागरिकांना झाला नव्हता. पण आता दुसरा टप्पा खुला झाल्यानंतर करी रोड, चिंचपोकळी, लालबाग, भायखळा व एनएम जोशी मार्गावर राहणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
डिलाइल पुल खुला झाल्यानंतर डॉ. भीमराव आंबेडकर रोड, करी रोड आणि भायखळा ते चिंचपोकळीहून येणाऱ्या वाहनांना या पुलाचा फायदा होणार आहे. या पुलामुळं दादरसोबतच लोअर परेल ते पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरात ये-जा करण्यास सोयीचे होणार आहे.
बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. अप्रोच रोडसह काही कामं बाकी आहेत. त्यानंतर लाइट, पाण्याची जाळी, फर्निशिंग व अन्य कामांसाठी 15 दिवस लागणार आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ब्रीजच्या पुननिर्माणच्या कामात एक मोठं आव्हान होतं ते म्हणते पश्चिम रेल्वेच्या रुळांवर 90 मीटर लांब आणि 1100 टन वजन असलेल्या दोन गर्डर उभारणे हे होते. रेल्वेने 22 जून रोजी 2022मध्ये पहिला गर्डर आणि 24 सप्टेंबरमध्ये दुसरा गर्डर टाकला होता.
डिलाइल पूल असुरक्षित असल्याचं समोर आल्यानंतर तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. जवळपास पाच वर्षांपूर्वी हा पूल बंद झाला होता. हा पूल बंद असल्याचे वाहतूक कोंडी होऊन हजारो वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो आहे. पण आता हा पूल लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आहे. मात्र अद्याप मुंबई महानगरपालिकेने पुलाच्या उद्धटनाची तारिख जाहीर केली नाहीये.
24 जुलै 2018मध्ये हा पूल रहदारीसाठी बंद करण्यात आला होता. आता नव्याने बांधण्यात आलेला हा पूल 6 लेनचा असून दोन्ही कडे फुटपाथ आहेत. जेणेकरुन पादचाऱ्यांना या पुलांवरुन सुरक्षित प्रवास करता येईल. त्याचबोरबर 5.8 मीटर इतकी पुलाची उंची आहे.