Mumbai News Dadar Shivaji Park: मुंबईमधील दादर येथील शिवाजीपार्कजवळच्या झाडावर चढून एका तरुणाने आत्महत्येची धमकी दिल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे. आज सकाळी आठच्या सुमारास हा तरुण गळ्यात साखळी घालून झाडावर चढला आणि आपण आत्महत्या करणार असल्याचं मोठमोठ्याने ओरडू लागला. यानंतर यासंदर्भातील माहिती स्थानिक पोलीस आणि अग्निशामनदलाला देण्यात आल्यावर या ठिकाणी पोलीस तसेच अग्निशामनदलाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. सदर तरुणाने प्रसिद्ध मराठी निर्माते आणि अभिनेते महेश कोठारेंना भेटून त्यांच्याशी मराठी चित्रपटासंदर्भातील परवानग्यांसाठी केलेल्या जाणाऱ्या पैशांच्या मागणीच्या समस्येबद्दल बोलायचं असल्याचं पोलीस आणि अग्निशामनदलाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं.
'करप्शन फाईट' असे बॅनर घेऊन हा तरुण शिवाजीपार्क जवळच्या एका झाडावर उपोषण करत आहे. त्याला खाली उतरवण्यासाठी पोलीस आणि अग्निशामक दल प्रयत्न करत आहे. आपण तयार केलेल्या चित्रपटाला परवानगी देण्यासाठी पैसे मागितले असं या तरुणाचं म्हणणं आहे. त्याने गळ्यात साखळी कुलूप घातलं आहे. त्याने आत्महत्या करण्याची धमकी देत सेन्सॉर बोर्ड पैसे मागत असल्याचा आरोप करताना त्याविरोधात आपलं हे आंदोलन आहे असं म्हटलं आहे.
हा तरुण एक चित्रपट निर्मिता आहे. त्याने एक चित्रपट निर्माण केला आहे. मात्र यासाठी सेन्सॉर बोर्ड त्याच्याकडे पैसे मागत असल्याचं त्याचं म्हणणं आहे. 'सेंट लेडी' नावाचा चित्रपट त्याने काढला होता. मात्र यासाठी सेन्सॉर बोर्ड त्याच्याकडे पैसे मागत असल्याचा त्याने आरोप केला आहे. याच मागणीसाठी तो झाडावर चढलेला आहे. गळ्यामध्ये साखळी आणि कुलूप लावलेलं आहे. तसेच या तरुणाच्या हातात कात्रीही आहे. प्रोड्युसरला बोलतावा. महेश कोठारेंना बोलावा. त्यांच्याशी मी बातचीत करणार आहे. असं या तरुणाचं म्हणणं आहे. महेश कोठारे यांना बोलवा तरच मी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी खाली उतरेल असं या तरुणाचं म्हणणं होतं.
मराठी चित्रपटसृष्टीसाठी जेव्हा परवानगी काढावी लागते तेव्हा मोठ्या प्रमाणात पैसे मागितले जातात. मराठी माणासाला चित्रपट बनवू दिले जात नाहीत, असं या तरुणाचं म्हणणं आहे. आता अग्निशामनदल आणि पोलीस या तरुणाला खाली उतरवण्यासाठी त्याच्याशी चर्चा करत असल्याचं दिसून आलं. अखेर एका तासानंतर पोलिसांना या तरुणाला चर्चा करुन खाली उतरवण्यात यश आलं.
कालच मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीमधून उडी मारुन आत्महत्या करण्याची धमकी एका इसमाने दिल्याचा प्रकार घडला होता. अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर धरणग्रस्त म्हणून आपल्या जमीनीचा मोबदला दिला जावा अशी मागणी या व्यक्ती केली. अधिकाऱ्यांनी म्हणणं ऐकून घेतल्यावर तो खाली उतरला.