Mumbai Latest News: वाहतुक कोंडीतून मुंबईकरांची आता सुटका होणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकनंतर (Mumbai Trans Harbour Link) आता कोस्टल रोडही प्रवाशांसाठी खुला होतोय. मरीन ड्राइव्ह ते वरळीपर्यंतचा एक 10.58 किमीपर्यंतचा पहिला टप्पा 9 फेब्रुवारी 2024 पर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न मुंबई महानगर पालिका करणार आहे. कोस्टल रोडचे चीफ इंजिनियर एमएम स्वामी यांनी कोस्टल रोडवर किती वेगमर्यादा असेल व नागरिक कसा प्रवास करु शकणार आहेत याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
कोस्टल रोड लवकरच नागरिकांसाठी खुला होणार आहे. या पुलामुळं नागरिकांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे. मात्र, या पुलावरुन प्रवास करण्यासाठी कारची वेगमर्यादा किती असावी, याबाबत चीफ इंजिनियर यांनी माहिती दिली आहे. मुंबईकरांना लवकरच मुंबईतच 80 किमी प्रतितास वेगाने गाडी चालवण्याची संधी मिळू शकते. खरं तर कोस्टल रोडचे बांधकाम आणि डिझाइन अशा प्रकारे करण्यात आले आहे की या पुलावरुन 100 किमी प्रतितास वेगाने गाडी चालवू शकतात. मात्र, सुरक्षिततेच्या कारणास्तव वेगमर्यादा 80 प्रतितास ठेवण्यात आली आहे.
वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रॅफिक मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टम (TMC) लावण्यात आलेले आहेत. जेणेकरुन प्रवाशांनी वेगमर्यादेचे पालन केले नाही तर कॅमेऱ्यात कैद होईल. त्याचबरोबर याची माहिती ट्रॅफिक पोलिसांना देण्यात येईल. व त्यानुसार दंड आकारला जाईल. सुरक्षेच्या कारणास्तव 100 मीटर अंतरापर्यंत एक असे सीसीटीव्ही लावण्यात येतील. वरळी ते मरीन ड्राइव्हपर्यंत 100 सीसीटिव्ही लावण्यात येणार आहेत. आगीच्या दुर्घटना घडू नयेत यासाठी शकार्डो सिस्टमदेखील लावण्यात येणार आहे. जेणेकरुन धूर निर्माण झाल्या आपोआप बोगद्यातील धूर आपोआप निवळेल. या पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर पहिल्यांदाच देशात केला जात आहे. त्याचबरोबर 4 क्विक रिस्पॉन्स वाहने, दोन फायर ब्रिगेडच्या गाड्यादेखील असणार आहेत. कोस्टल रोडच्या माध्यमातून 10 किमीपर्यंतचा प्रवास 10 मिनिटात पूर्ण करु शकणार आहात.
- कोस्टल रोडचे 84 टक्क्यांपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे.
- 13983 कोटींच्या खर्च अपेक्षित
- वाहन चालकांचा 70 टक्के वेळ आणि 34 टक्के इंधनाची बचत होणार आहे.
कोस्टल रोडचा एक टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. मरीन ड्राइव्ह ते वरळीपर्यंतचा एक हिस्सा खुला होईल. मात्र, त्यामुळं दक्षिण मुंबईतील वाहतुक कोंडीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बीएमसीचे माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी आरोप केला आहे की, कोस्टल रोडचा पहिल्या टप्प्याचे लोकार्पण इतक्या घाईत केले जात आहे ते निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून. कोस्टल रोडच्या या भागातून वाहने फक्त दक्षिण मुंबईत येतील. मात्र, परत जाण्यासाठी तोच जुना रस्ता वापरावा लागणार आहे. यामुळं वाहतुक कोंडी कमी होण्यापेक्षा वाढण्याची शक्यता आहे.