प्रफुल्ल पवार, अलिबाग : रायगड (Raigad) जिल्ह्यातील शेकडो गावांमधले रस्ते अंधारात गेले आहेत. महावितरणच्या (MSEDCL) पॉवर कट मोहिमेमुळे हा फटका बसला आहे. वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. स्ट्रीट लाईटची (street light)1 हजार 90 मीटरचे वीज कनेक्शन तोडले गेले आहे. 816 ग्रामपंचायतींची 149 कोटी रुपयांची थकबाकी असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
अनेक ग्रामपंचायतींनी 3 वर्षे वीजबिल भरलेच नाही. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. पॉवर कट मोहिमेत ही धक्कादायक बाब समोर आहे. विद्युत पुरवठा खंडीत केल्याने ग्रामीण भागातील पाणी पुरवठयावर देखील परिणाम झाला आहे. 702 पाणी योजनांपैकी 96 योजनांचे कनेक्शन तोडले गेले आहे. अलिबाग, पनवेल ग्रामीण, रोहा आणि गोरेगाव या चारही विभागात महावितरणची धडक मोहीम राबविण्यात आली आहे. वीजबिल भरून सहकार्य करण्याचे महावितरणने आवाहन केले आहे.
रायगडमधील स्ट्रीट लाईटच्या 2 हजार 754 पैकी 1 हजार 90 कनेक्शन तोडण्यात आली आहेत. उर्वरित कनेक्शन लवकरच तोडण्यात येणार आहेत. 816 ग्राम पंचायतीची तब्बल 149 कोटींची थकबाकी आहे. महावितरणच्या वीजबिल वसुली आणि पॉवर कट मोहिमेचा परिणाम ग्रामीण पाणी पुरवठ्यावर देखील झाला आहे. 702 पाणी 96 योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे . परिणामी महिलांना विहिरीवर किंवा हातपंपावर पाणी भरावे लागत आहे.
पाणीपुरवठा योजनांची 6 कोटी 21 लाखांची थकबाकी आहे. त्यामुळे अलिबागसह पनवेल ग्रामीण , रोहा आणि गोरेगाव अशा चारही विभागात पॉवर कट मोहीम राबवली जात आहे. एकट्या गोरेगाव विभागातील ग्रामपंचायतींनी 26 कोटी 68 लाख रुपये थकवलेत. उर्वरित थकबाकीदार गावातील वीज पुरवठा देखील लवकरच खंडित केला जाणार असल्याचे संकेत महावितरणने दिलेत.
पूर्वी स्ट्रीट लाईटचे बिल राज्य सरकार भरत असे . एप्रिल 2018 पासून ग्रामपंचायतींनी बिल भरावे , असा निर्णय शासनाने घेतला .मात्र अनेक ग्रामपंचायतींनी 2018 पासून सार्वजनिक पथदिव्यांची वीजबिले भरलीच नसल्याची धक्कादायक बाब यानिमित्ताने समोर आलीय. राज्य सरकार आणि ग्राम पंचायत यांच्यातील समन्वयाचा अभाव हे यामागचे प्रमुख कारण असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान ही वीजबिल वसुली मोहीम यापुढेही सुरू राहणार असून व्यक्तीगत ग्राहकांबरोबरच ग्रामपंचायतीची वीजबिले न भरल्यास कनेक्शन कापली जाणार आहेत . त्यामुळे वीजबिल भरून ग्रामपंचायतींनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांनी केले आहे.