रामदास कदम यांच्या 'त्या' वक्तव्यावर छत्रपती संभाजी राजे म्हणाले...

माझ्याकडे करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत.

Updated: Jan 8, 2019, 04:07 PM IST
रामदास कदम यांच्या 'त्या' वक्तव्यावर छत्रपती संभाजी राजे म्हणाले... title=

नवी दिल्ली: खासदार संभाजी राजे यांच्यासंदर्भात राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केलेल्या टिप्पणीमुळे सध्या वाद पेटला आहे. संभाजी राजे यांचे सचिव योगेश केदार यांनी कदम यांना परस्पर फोन करून धमकी दिल्यामुळे हा वाद आणखीनच चिघळला होता. या संभाषणाची क्लीपही व्हायरल झाली होती. या पार्श्वभूमीवर संभाजी राजे यांनी 'झी २४ तास'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, मी संबंधित क्लीप ऐकली. त्या क्लीपमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेचे मी समर्थन करत नाही, ते माझे संस्कारही नाहीत. माझ्या सचिवाला मी कदम यांच्याशी बोलण्याची परवानगी दिली नव्हती, असे संभाजी राजे यांनी स्पष्ट केले. 

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना धमकी

तसेच रामदास कदम यांना माझ्याविषयी काय वाटते हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांना काय बोलायचं ते बोलू दे. माझ्याकडे करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे अशा लहानसहान गोष्टींकडे लक्ष द्यायला माझ्याकडे वेळ नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

भाजपच्या बैठकीत छत्रपती संभाजीराजे; राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या

काही दिवसांपूर्वी दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील खासदारांची बैठक झाली होती. त्यावेळी संभाजी राजे हेदेखील बैठकीला उपस्थित होते. त्यांच्या या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यानंतर संभाजी राजे यांनी नारायण राणे यांना मराठा आरक्षणाचे श्रेय देऊ केले होते. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी संभाजी राजे यांना टोला हाणला होता. संभाजी राजे यांनी लाचारी पत्करू नये, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर संभाजी राजे यांचा सचिव योगेश याने फोनवरून रामदास कदम यांना धमकावले होते. त्याने यावेळी अर्वाच्च भाषा वापरली होती.