Sexual Harassment Case: महिलांविरोधातील लैंगिक अत्याचाराची प्रकरणं दिवसोंदिवस वाढताना दिसत आहेत. त्यामुळेच देशात अशाप्रकरणांविरोधातील कायदे अधिक कठोर करण्यात आले आहेत. मात्र अनेकदा या कायद्यांमधील काही तरतूदी किंवा हूपहोल्सचा फायदा आरोपी घेतात. नुकतेच असेच एक प्रकरण मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणीसाठी आलं. या प्रकरणामध्ये कोर्टाने निर्णय देताना अल्पवयीन मुलीच्या डोक्यावर तसेच पाठीवर हात फिरवणे हा लैंगिक अत्याचार होऊ शकत नाही असं म्हटलं आहे.
मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणातील 28 वर्षीय व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली आहे. कोणत्याही चुकीच्या हेतूशिवाय अल्पवयीन मुलीच्या पाठीवर आणि डोक्यावर हात फिरवल्यास तिच्या मनात लज्जा निर्माण होत नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. हे प्रकरण 2012 चं आहे. त्यावेळी 18 वर्षीय व्यक्तीने 12 वर्षीय मुलीला लाज वाटेल अशी कृती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार आरोपीने तिच्या पाठीवर आणि डोक्यावरुन हात फिरवत, "तू आता मोठी झालीस," असं म्हटलं होतं.
कोर्टाने 10 फेब्रुवारी रोजी या प्रकरणाचा निकाल दिला. या निकालाची प्रत 13 मार्च रोजी समोर आली आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकल खंडपीठाने दोषसिद्धता रद्द करताना या प्रकरणामध्ये असं दिसून येत नाही की ज्या व्यक्तीवर आरोप करण्यात आलेत तिचा हेतू चुकीचा होता. उलट त्याच्या बोलण्यावरुन पीडित तरुणीकडे तो मुलीप्रमाणे पाहत होता असं दिसून येत आहे. "एखाद्या महिलेच्या मनात लाज निर्माण होईल अशी वर्तवणूक करण्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या मनात तसा हेतू असणं आवश्यक असतं," असं न्या. डांगरे यांनी म्हटलं आहे.
"12-13 वर्षीय पीडितेने कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या हेतूचा उल्लेख केला नाही. तिला काही चुकीच्या कृतींमुळे अवघडल्यासारखं वाटलं असं म्हटलं आहे," असं निकाल सुनावताना कोर्टाने म्हटलं. आरोप करणाऱ्या पक्षाला या व्यक्तीचा हेतू मुलीला लाज वाटावी असा होता हे सिद्ध करण्यात अपयश आल्याचंही कोर्टाने म्हटलं आहे.
हा संपूर्ण प्रकार 15 मार्च 2012 साली घडला तेव्हा आरोपी हा 18 वर्षांचा होता. काही कागदपत्रं देण्यासाठी तो या मुलीच्या घरी गेला होता. त्यावेळी मुलगी घरी एकटीच होती. त्याने या मुलीच्या डोक्यावरुन आणि पाठीवरुन हात फिरवल्यानंतर ती मदतीसाठी ओरडू लागली.
कनिष्ठ कोर्टाने या प्रकरणामध्ये आरोपीला दोषी ठरवलं आणि त्याला 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर या व्यक्तीने हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने कनिष्ठ कोर्टाचा निकाल चुकीचा होता असं सांगितलं. संबंधित व्यक्तीने कोणताही चुकीचा हेतू मनात न ठेवता मुलीच्या डोक्यावरुन हात फिरवल्याचं निरिक्षण नोंदवत कोर्टाने या तरुणाची निर्दोष मुक्तता केली.