Old Pension Agitation : राज्य सरकारी कर्चमाऱ्यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद, रुग्णसेवेसह अनेक आस्थापना ठप्प

Old Pension :राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत. राज्य सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. 

Updated: Mar 14, 2023, 09:19 PM IST
Old Pension Agitation : राज्य सरकारी कर्चमाऱ्यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद, रुग्णसेवेसह अनेक आस्थापना ठप्प title=

Maharashtra Strike Old Pension :राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत. राज्य सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संपात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीही सहभागी झालेत. यवतमाळ जिल्ह्यात संपामुळे काही शाळा बंद ठेऊन मुलांना सुट्टी देण्यात आली आहे. तर काही शाळा सकाळी भरल्या पण तिथे शिक्षकच आलेले नाहीत. तर तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपाचा परिणाम मुंबईत रूग्णसेवेवर होताना दिसत आहे.

निर्णय झाला नाही तर पुन्हा आंदोलन !

दरम्यान, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची एकनाथ खडसेंना विधानपरिषदेत साद घातली. जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी विरोधक सभात्याग करत होते. मात्र एकनाथ खडसे बसून होते. आमदार कपिल पाटील यांनी एकनाथ खडसे यांचा हाथ धरून त्यांना उठवलं, यावेळी नाथा भाऊ माझं ऐकतील आणि बसतील, असं म्हणत गिरीश महाजनांनी खडसेंना साद घातली. तर दुसरीकडे जुन्या पेन्शन योजने सुरू असणाऱ्या आंदोलन मधून प्राथमिक शिक्षण संघ कर्मचारी यांनी मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री याच्या बरोबर बैठक झाल्यावर संपातून माघार घेतलीय. मात्र सरकारने लवकर निर्णय घेतला नाही तर पुन्हा आंदोलन करणार असा इशारा दिला आहे.

कोकण भवनमधील कर्मचारी आंदोलन 

जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी , आज राज्य सरकारी कर्मचारी आंदोलन पुकारले आहेत, कोकण भवन मधील कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात  सहभाग घेत , जुनी पेन्शन लागू  करण्यासाठी घोषणाबाजी केली, तसेच आमदारांना पेन्शन लागू केले आहे मग कर्मचाऱ्यांना का नाही अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक 

जुनी पेन्शन व इतर मागण्यांसाठी आजपासून सुरू झालेल्या बेमुदत संपात रायगड जिल्ह्यातील सर्व सरकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे एरव्ही गजबजणाऱ्या शासकीय कार्यालयांमध्ये आज शुकशुकाट जाणवत होता. सर्व संघटनांच्या समन्वय समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी एकच मिशन, जुनी पेन्शन अशा घोषणा देण्यात आल्या. 

सोलापूर जिल्ह्यातील 25000 कर्मचारी बेमुदत संपावर

 जुन्या पेन्शन मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनेने १४ मार्च रोजी राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात सोलापूर महानगरपालिकेचे 4 हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. इंद्रभवन परिसरात सोलापूर महापालिकेचे कर्मचारी एकत्र जमून त्यांनी घोषणाबाजी करत संपाला पाठिंबा दिलाय. या आंदोलनाचा फटका महापालिकेतील कामाला बसला आहे. सर्व सामान्य नागरिक आपल्या कामानिमित्त महापालिकेत येत आहेत परंतु कर्मचारी जागेवर नसल्याने त्यांची तारांबळ उडाली आहे.  

  सरकारी कर्मचारी संपाचा आरोग्य सेवेला फटका 

आजपासून सुरू झालेल्या सरकारी कर्मचारी संपात आरोग्य विभागातील कर्मचारी देखील सहभागी झाले आहेत. त्याचा फटका जिल्ह्यातील आरोग्य सेवेला बसल्याचे दिसून आले. ६५६ पैकी कायम ३०३ कर्मचारी संपात सामील झाले आहेत. परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपात सहभागी झाल्याने पहिल्याच दिवशी रुग्णसेवा आणि स्वच्छता यावर परिणाम झाला आहे.

अहमदनगर कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन 

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो कर्मचाऱ्यांनी धरणा आंदोलन सुरू केला आहे जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी,शिक्षक आणि शिक्षकेतर महापालिका नगरपालिका, नगरपंचायत कर्मचारी समन्वय समितीने पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदात संपात कर्मचारी सहभागी झाले असून जिल्ह्यातील सुमारे तीस हजार कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी दहा वाजेपासून कर्मचारी एकत्र येत आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.

मालेगावला राज्य कर्मचाऱ्यांचा मोर्चा 

 राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेतर्फे जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी संपानिमित्त मालेगावमध्ये कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारत कर्मचाऱयांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला सरकारी, निमसरकारी कर्मचाऱयांसह,आरोग्य, महसूल, महापालिका, जिल्हा परिषद,पंचायत समिती, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती पटांगणात एकत्र आले होते. ''पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची'' ''जो पेन्शन की बात करेगा वो देश पे राज करेगा'' ''सरकार हिलाएंगे पेन्शन बचाएंगे'' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

वर्ध्यात 11 हजार कर्मचारी संपावर 

वर्ध्यात जुन्या पेंशन मागणीसाठी 11 हजार कर्मचारी संपावर गेले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे एकत्र येत कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली आहेय. विविध विभागातील कर्मचारी या संपात सहभागी झाले आहे. एकच मिशन जुनी पेन्शन ही घोषणा करून जुन्या पेन्शन ची मागणी करण्यात आली आहे. यावेळी आंबेडकर चौक येथून मोर्चा काढण्यात आलाय. मोर्चा छत्रपती शिवाजी चौक, बडे चौक, बाजाज चौक मार्गे झाशी राणी चौकात पोहचला. या मोर्चात महिला कर्मचारी देखील मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.

संघटनांचा हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

 नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर 23 संघटनांनी एकत्र येत भव्य मोर्चा काढला. नवीन पेन्शन योजना उपयोगाची नसून जुनीच पेन्शन कर्मचाऱ्यांच्या हिताची आहे,सदर जुनी पेन्शन योजना सुरू करावी यामागणीसाठी कर्मचारी आक्रमक झाले होते, हातात फलक घेत कर्मचारी सरकार विरोधात रोष व्यक्त करीत होते.

वाशिम  येथे कर्मचाऱ्यांचा मोर्चा

जुन्या पेन्शन च्या मागणीसाठी आज वाशिम जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचारी,आरोग्य कर्मचारी,जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आज बेमुदत संप पुकारला असून या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागणीसाठी मोर्चा काढला सदर मोर्चाची सुरुवात वाशिम शहरातील जुन्या जिल्हा परिषदे पासून होऊन हा मोर्चा अकोला नाका मार्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला.यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणा देत जुनी पेन्शन देण्याची मागणी केली.