हे फक्त आईच करू शकते! काळजाच्या तुकड्याला वाचवण्यासाठी दिलं यकृत

कावीळ झाली आणि पुढच्या काही दिवसांत मुलगा कोमात गेला...मृत्यूच्या दाढेतून आईनं मुलाला वाचवलं

Updated: Jun 9, 2021, 12:41 PM IST
हे फक्त आईच करू शकते! काळजाच्या तुकड्याला वाचवण्यासाठी दिलं यकृत title=

मुंबई: आपल्या काळजाच्या तुकड्याला वाचवण्यासाठी आई काहीही करू शकते हे आजपर्यंत अनेक सिनेमांमध्ये पाहिलं असेल पण सिनेमातच नाही तर प्रत्यक्षातही आई हे करत असते. अगदी आपलं काळीजही काढून द्यायला आई तयार होते. आईनं आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आपलं यकृत दिल्याची घटना समोर आली आहे. आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी तिने आपल्या शरीराचा एक भाग मुलासाठी दिला. हे वाचून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. कोल्हापुरातल्या कोपार्डे परिसरात ही घटना समोर आली आहे. 

16 वर्षांचा एकुलता एक मुलगा अचानक आजारी पडला. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर काविळ असल्याचं समोर आलं. त्याची प्रकृती बिघडत गेली. तो कोमात गेला आणि त्याच्या मेडिकल रिपोर्टमधून त्याचं यकृत बिघडल्याची माहिती डॉक्टरांनी घरच्यांना दिली. मुलाला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. अखेर आईनं आपलं यकृत मुलाला दान करण्याचा निर्णय घेतला. 

कृणाल पाटील इयत्ता बारावीमध्ये शिकत आहे. त्याला कावीळ झाल्यानं त्याची प्रकृती जास्त बिघडली. त्याचं यकृत बिघडल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. आईनं आपल्या मुलाला वाचवण्यासाठी स्वत:चं यकृत दिलं. या मुलावर शस्रक्रिया करण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. बुधवारी ज्युपिटर रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. मृत्यूशी झुंज देणाऱ्या मुलाला आईनं बाहेर काढलं. आपलं यकृत देऊन मुलाला जीवदान दिलं.