नवाब मलिकांविरोधातील तक्रार मागे? मोहित कंबोज यांनी स्पष्टच सांगितले...

Big Relief to Nawab Malik: नवाब मलिक यांच्याविरोधात कंबोज यांनी दाखल केलेली तक्रार मागे घेतल्याचे वृत्त समोर आले पण यावर मोहित कंबोज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय आहे हे प्रकरण? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 19, 2023, 11:06 AM IST
नवाब मलिकांविरोधातील तक्रार मागे? मोहित कंबोज यांनी स्पष्टच सांगितले... title=

Big Relief to Nawab Malik: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना कोर्टाने दोन महिन्यासाठी जामिन मंजूर केला आहे. यानंतर आता नवाब मलिक हे शरद पवार की अजित पवार गटात सामिल होणार? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. दरम्यान नवाब मलिक यांच्याविरोधात कंबोज यांनी दाखल केलेली तक्रार मागे घेण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. हे प्रकरण नेमके काय आहे? याबद्दल जाणून घेऊया. 

नवाब मलिक विरुद्ध मोहित कंबोज यांच्यातील सामना सर्वांनी पाहिला. ड्रग्स केसपासून अनेक आरोप नवाब मलिक यांनी मोहित कंबोज यांच्यावर केले. दुसरीकडे नवाब मलिक तुरुंगात जाणार असे भाकीत मोहित कंबोज यांनी अनेकदा केले होते. कंबोज यांनी मलिक यांच्याविरोधात 2 तक्रार दाखल केल्या होत्या. 2021 साली नवाब मलिक यांनी शिवडी कोर्टात हजेरी लावताना कोरोना नियमांचे उल्लंघन केले अशी तक्रार मोहित कंबोज यांनी केली होती.

या पार्श्वभूमीवर 28 ऑगस्टला मोहित कंबोज आणि नवाब मलिक यांना कोर्टाने सुनावणीसाठी बोलावले आहे. 2021 मध्ये नवाब मलिकांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. दरम्यान मलिकांविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी कंबोज यांनी कोर्टाला विनंती केल्याचे वृत्त माध्यमांतून समोर आले होते.  दरम्यान मोहित कंबोज यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. 

मोहित कंबोज यांनी तक्रार मागे घेतल्याचे वृत्त माध्यमांनी दिले. नवाब मलिक यांच्या 2021 विरोधात मी याचिका दाखल केली होती. कोर्टाने त्यांना न्यायालयात बोलावले होते. त्यावेळी त्यांनी कोरोना नियम पायदळी तुडवले होते. त्यावेळी यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी मी केली होती. पण कोर्टाने ती फेटाळली होती. या विरोधात मी सेशन कोर्टात याचिका दाखल केली होती. पण तिथे देखील काही कार्यवाही झाली नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान 2022 मध्ये महाराष्ट्र सरकारने कोरोना केसेस मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कोरोना केस मागे घेण्याचा अर्ज आम्ही केला, असे ते म्हणाले. यामध्ये मानहानीच्या केसचा संबंध नव्हता असेही त्यांनी स्पष्ट केले. 

असे असले तरीही मी केलेली मानहानीची तक्रार आजही कायम आहे. माझी लढाई काय राहीलं. मानहानीच्या तक्रारीवर आजही कोर्टाच्या तारखा येतात. त्यावर त्यांना उत्तर द्यावेच लागेल असे कंबोज यांनी सांगितले.

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली होती. यानंतर साधारण दीड वर्षे नवाब मलिक हे ईडीच्या कस्टडीमध्ये होते. यासंदर्भात मलिक यांच्याकडून वारंवार अर्ज करण्यात आले. पण त्यांना कोणताही दिलासा मिळत नव्हता. दुसरीकडे राज्यात राष्ट्रीवादी कॉंग्रेसमधील अजित पवार यांचा गट शिवसेना भाजप सोबत सत्तेत सामिल झाला. राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रीपदे मिळाली. आता नवाब मलिक काय भूमिका घेणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. 

याच पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना प्रकृतीच्या कारणास्तव दोन महिन्यांचा अंतरिम जामीन दिला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 14 ऑगस्ट रोजी नवाब मलिक तुरुंगातून बाहेर पडले. यानंतर शरद पवार आणि अजित पवार गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे नवाब मलिक काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. पण सध्या तब्येतीकडे लक्ष देणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. आरोग्याची काळजी घेणे हे माझ्यासाठी प्राधान्य आहे. शहरातील सर्वात चांगल्या डॉक्टरांकडून मी उपचार घेणार आहे. पुढील महिनाभरात माझी प्रकृती सामान्य होईल, असेही नवाब मलिक यांनी सांगितल्याचे म्हटले जात आहे.